पाचेगावात वाळूअभावी 25 घरकुले रखडली

तस्कर मारताहेत डल्ला; घरकुलासाठी मोटारसायकलवरून वाळू नेण्याची वेळ
पाचेगावात वाळूअभावी 25 घरकुले रखडली
File Photo

पाचेगाव |वार्ताहर| Pachegav

नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथे मुळा व प्रवरा या दोन नद्यांचा संगम असल्याने बहुमूल्य वाळू आहे. या वाळूवर तालुक्यातील व बाहेरील वाळूतस्कर डोळे लावून बसले आहेत.पण गावातील घरकुलांसाठी वाळू मिळेनाशी झाल्याने गावातील घरकुले वाळू वाचून थांबली आहेत. आजही गावातील वाळूची तस्करी जोमाने होत आहे.

घरकुल वेळेत पूर्ण करण्यासाठी काही ग्रामस्थ तर वाळू मोटारसायकल वर वाहून नेत आहेत. ग्रामस्थांपुढे दुसरा मार्ग नसल्याकारणाने हा मार्ग अवलंबून आपले घरकुल वेळेत पूर्ण करण्यासाठी धडपड करताना दिसत आहेत. गावात जवळपास 71 घरकुले मंजूर झाली आहेत. त्यापैकी 46 पूर्ण झाली असून उर्वरित 25 घरकुले वाळूवाचून थांबली आहेत.

गावातील स्वतःला सामाजिक कार्यकर्ते मानणार्‍यांनी हे कृत्य केले असल्याचा आरोप घरकुल लाभार्थी ग्रामस्थांनी केला आहे.रात्री उशिरा वाळू तस्कर मात्र वाळूवर डल्ला मारत आहेत. मात्र हे सामाजिक कार्यकर्ते या वाळू तस्करांना रोखण्यासाठी कोणत्याही प्रकारचा उपायोजना करताना दिसत नाहीत. मात्र गावात घरकुलासाठी लागणारी वाळू थांबवून व वाळू वाचून घरकुलाचे काम थांबविण्यासाठी जोरदारपणे प्रयत्न करताना दिसत आहे. गावात भरमसाठ वाळू आहे,मात्र गावातील ग्रामस्थांच्या घरकुलासाठी नाही, तर वाळू तस्करांसाठी आहे, असे ग्रामस्थ बोलताना दिसत आहेत.

पाचेगावात जवळपास 25 घरकुलांची कामे चालू आहेत, पण काही नागरिकांमुळे गोरगरीब जनतेच्या घरकुलाचे काम वाळू वाचून खोळंबले आहे. पंचायत समिती मार्फत या कामांना मुदतवाढ देखील देण्यात आली आहे, त्यामुळे ज्यांचे घरकुल थांबले आहे अशांना थोडासा दिलासा मिळाला आहे. पण किती दिवस वाळूची प्रतीक्षा करावी लागेल हाच प्रश्न या घरकुल योजनेत सहभागी नागरिकांना पडला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com