पाचेगाव, पुनतगाव परिसरात परतीच्या मान्सूनचा रुद्रावतार

सोयाबीन पिके पाण्याखाली || कापूस भिजला || शेतकर्‍यांचे नुकसान
पाचेगाव, पुनतगाव परिसरात परतीच्या मान्सूनचा रुद्रावतार

पाचेगाव |वार्ताहर| Pachegav

नेवासा तालुक्यातील पाचेगाव, पुनतगाव व कारवाडी परिसरातील शेतकर्‍यांना परतीच्या मान्सूनचा रुद्रावतार बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास पाहायला मिळाला. सलग तीन ते साडेतीन तास मुसळधार पावसाने अक्षरशः परिसराला झोडपून काढले. त्यामुळे काढणीला आलेली सोयाबीन पिके पाण्याखाली गेली आहेत. तर कापसाच्या देखील जागेवरच झाडाला वाती झाल्याने शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले आहे.

शेतकर्‍यांनी आता या भागात कांदा बी टाकण्याची लगबग सुरू केली होती. त्यात काही शेतकर्‍यांनी महागडे बियाणे खरेदी करून कांदा बी टाकले आहे. रोपे जमिनीवर आली पण जोराच्या पावसाने रोपांना फटका बसला आहे.

पहाटेच्या सुमारास पावसाने जोर धरून परिसरात 45 मिलिमीटर पाऊस पडला.तसेच नेवासा बुद्रुक मंडलात 102 मिलिमीटर इतकी एकाच रात्री पावसाची नोंद झाली. त्यामुळे आता महसूल व कृषी खात्याकडून सरसकट नुकसान पंचनामे करण्यात यावे, अशी मागणी आता या परिसरातून मोठ्या प्रमाणावर होऊ लागली आहे. पीकविमा योजनेत सहभागी झालेल्या शेतकर्‍यांना देखील विमा कंपनीच्या प्रतिनिधींची ओढ लागली आहे. आता तरी नुकसान पीकक्षेत्र पाहणी करण्यासाठी यावे अशी आशा येथील नुकसान झालेले शेतकरी करीत आहेत.

शुक्रवारी दुपारपर्यंत या भागात पाऊस पडत होता. त्यामुळे या भागातील सोयाबीन, कांदा रोपे, कापूस उत्पादक शेतकर्‍यांनी धास्ती घेतली आहे, हा परतीचा पाऊस खरिपातील हंगामात घेतलेली पिके तोंडाशी आलेला घास हिराहून घेतो की काय? अशी परिस्थिती या भागात निर्माण झाली आहे. या भागात या पावसाने विहीर व बोअरवेलमध्ये पाणी पातळीत नक्कीच वाढ दिसून येणार आहे.

आमदार गडाखांनी केली पाहणी

तालुक्यातील शेतकर्‍यांना न्याय देण्यासाठी आमदार शंकरराव गडाख यांनी तीन-चार दिवसांपूर्वी तहसीलदार, तालुका कृषीअधिकारी व अन्य तालुक्यातील अधिकार्‍यानची तातडीने बैठक बोलावून शेतकर्‍यांच्या नुकसानीची पाहणी करून पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. पीक विमा कंपन्याना देखील सर्व्हे करण्यासाठी निर्देश देण्यात आले. त्यामुळे या भागातील शेतकर्‍यांनी आ.गडाख यांचे आभार व्यक्त केले आहेेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com