पाचेगाव-पुनतगाव परिसरात उन्हाळी कांदा लागवडीला वेग

अतिवृष्टी नुकसान भरपाईची शेतकर्‍यांना प्रतिक्षाच
पाचेगाव-पुनतगाव परिसरात उन्हाळी कांदा लागवडीला वेग

पाचेगाव |वार्ताहर| Pachegav

नेवासा तालुक्याच्या पश्चिम भागात उन्हाळी कांदा लागवडीला वेग आला असून यासाठी प्रतिएकरी शेतकर्‍यांना आठ ते साडेआठ रुपये मोजावे लागावे लागत आहेत.

या भागात अतिपावसाने प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते, पण शेतकर्‍यांना आतापर्यंत कोणतीही शासकीय मदत न मिळता या भागातील शेतकरी पुन्हा एकदा शेती करण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे.

यंदा या भागात पाणी पातळी चांगली असल्याकारणाने महागडे कांदा बियाणे घेऊन शेतकर्‍यांनी आपला शेती व्यवसाय टिकवून धरला आहे. कांदा लागवडीबरोबर ऊस लागवड देखील मोठ्या प्रमाणात या भागात पाहायला मिळत आहे. कांद्याचे गोट तर इतक्या मोठ्या प्रमाणावर झाले की, पुढीलवर्षी कांदा बियाणे मातीमोल भावात विकते की काय असा प्रश्न बर्‍याच शेतकर्‍यांना पुढें निर्माण झाला आहे.

या भरपाईच्या आशेवर ग्रामीण भागातील शेतकरी आस धरून होता, आजून तरी या भागातील शेतकर्‍यांना मदत मिळाली नाही. तरी पण नुकसान भरपाई मिळण्याच्या आशेवरच ग्रामीण भागातील शेतकरी तग धरून आहे.

राज्य सरकारने आता तरी शेतकर्‍यांच्या बँक खात्यात मदत रक्कम लवकरात लवकर जमा करून दिलासा द्यावा अशी अपेक्षा शेतकरी बळीराजा पार्टीचे अध्यक्ष हरिभाऊ तुवर, तालुका दुष्काळ निवारण समितीचे अध्यक्ष दिलीप पवार, सोसायटीचे अध्यक्ष प्रकाश जाधव, भाजप जिल्हा कार्यकरणी बाळासाहेब कुलकर्णी, अशोक कारखानाचे माजी संचालक भागवत पवार, सुनील गोळेचा, शंकर पुंड आदी शेतकर्‍यांनी व्यक्त केली आहे.

मागील वर्षीच्या कांद्याला कमी जास्त भाव वगळता शेतकर्‍यांना कोणत्याच शेती पिकांना आधारभूत किंमत मिळाली नाही. आतातर ऊस उत्पादक शेतकरीदेखील ऊस दर संदर्भात कोंडीत सापडला आहे. हे असेच भाव शेतकर्‍यांच्या पदरी पडले तर कृषिप्रधान देशातील शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही.

- दत्तात्रय पाटील माजी उपसरपंच, पाचेगाव

राज्य सरकारने व केंद्र सरकारने शेतकर्‍यांना शेतातील पिकांना आधारभूत किंमत द्यावी. म्हणजे शेतकरी कुटुंबियांच्या सदस्यांना मोठा दिलासा मिळेल. राज्यातील व देशातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी मोठी मदत होईल. तसेच शेतकर्‍यांना आपल्या पिकांना चांगला भाव मिळाला तर राज्यातील नव्हे तर देशातील शेतकरी कधीच कर्जबाजारी होणार नाही.

- भास्कर तुवर कार्यकर्ता, शेतकरी संघटना

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com