कांदा पिक बुरशी व करप्याला पडले बळी

अवकाळी पाऊस व हवामानाचा परिणाम || आतापर्यंत 5 शेतकर्‍यांनी 18 एकर पिकावर फिरवला नांगर
कांदा पिक बुरशी व करप्याला पडले बळी

पाचेगाव |वार्ताहर| Pachegav

हवामान बदलाचा (Climate Change) परिणाम दिवसेंदिवस वाढत असून त्याचा सर्वात जास्त परिणाम शेती (Farm) क्षेत्रावर होत आहे. अवकाळी पाऊस (Untimely Rain) तसेच वातावरणातील कमी अधिक तापमान यामुळे शेती आणि शेतकरी संकटात आलेले आहे. नेवासा तालुक्यातील (Newasa Taluka) कांदा पिकात (Onion Crops) अग्रेसर असणार्‍या पाचेगाव (Pachegav) व पुनतगाव (Punatgav) मध्ये नोव्हेंबर महिन्यात लागवड झालेले कांदा पिक (Onion Crops) बुरशी व करप्याला (Fungi and carpa) बळी पडले असून रोपांची जागीच मर झाल्याने अनेक शेतकर्‍यांना कांद्याचे पीक (Onion Crops) नांगरुन टाकावे लागले आहे.

सध्या उन्हाळी कांदा लागवडी (Summer Onion Planting) जोरात सुरू आहे. पण सध्या ज्या कांदा लागवडी नोव्हेंबरमध्ये झाल्या अशा शेतकर्‍यांच्या कांदा पिकाला जमिनीत अतिप्रमाणात तयार झालेली बुरशी व करपा (Fungi and carpa) या रोगाने कांदा पिके आपली माने जमिनी सोडायला तयार नाही. त्यात कांदा रोपांची जागीच मर होऊन कांदा रोपे वाळून जात आहे.

पुनतगाव येथील मोहन यशवंत घोलप यांनी बारा एकरात कांदा पीक घेतले होते. पण खराब वातावरणमुळे कांदा पीक वाया गेले. त्यातच त्यानी जवळपास बारा एकर कांद्यासाठी अडीच लाख रुपये खर्च करून पदरी निराशा पडली असून या भागातील शेतकरी हवालदिल झाला आहे.

लागवडी झालेल्या कांदा पिकाबरोबरच लागवडीस आलेली कांदा रोपे देखील या रोगाने पिवळी पडून वाढ खुंटली आहे. इतका मोठा खर्च करून देखील शेतकर्‍यांना आपल्या कांदा पिकावर नांगर फिरवण्याची वेळ आल्याने शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. पूर्ण पीक डोळ्यासमोर वाया जात असल्याने शेतकरी कर्जाच्या खाईत जात आहे अशी प्रतिक्रिया नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना कडून व्यक्त होत आहे.

कांदा बी खरेदी, रोपाची देखभाल, कांदा क्षेत्र नांगरट, रोटाव्हेटर मारणे, सार्‍या पाडणे, कांदा रान मजुरांकडून बांधणे, कांदा लागवड व रासायनिक खते, बुरशीनाशकांची फवारणी इतका मोठा खर्च करूनही शेतकर्‍यांचे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.

पुनतगाव व पाचेगाव भागात देखील भास्कर प्रभाकर शिंदे यांचा साडेतीन एकर कांदा वाया गेला. रघुनाथ थोरात यांचे एक एकर कांदा, भनाजी होन यांचा एक एकर कांदा, कारवाडी येथील गोकुळ सुभाष तुवर यांचा एक एकर कांदा असा एकूण आतापर्यंत परिसरात 18 एकर कांदा पीक वाया गेले आहे.

नर्सरी प्लॉटवर कांद्याच्या रोपांमध्ये रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला तर शेतकर्‍यांनी अशा रोपांची लागवड करू नये. तसेच ज्या शेतकर्‍यांचे क्षेत्र बाधित झाले, त्यांनी कृषी विभागाकडे रितसर अर्ज करावा. त्यानंतर विद्यापीठाचे शास्त्रज्ञ व कृषी विभागाचे अधिकारी व पंचनामा कमिटी बाधित क्षेत्र पाहणी करून शेतकर्‍यांना अहवाल देण्यात येईल. तसेच कांदा व अन्य लागवडी व पेरणी करताना शेतकर्‍यांनी बुरशीरोधक फवारणी करून बी प्रक्रिया करूनच लागवडी कराव्यात.

-दत्तात्रय डमाळे तालुका कृषी अधिकारी, नेवासा

मागील वर्षी कांद्याचे दर कमी-अधिक टिकून राहिले. त्यामुळे या वर्षीही कांदा क्षेत्र वाढले. पण ज्यादा पावसाने आर्द्रतेमुळे जमिनीत ओलावा आहे. त्यामुळे कांदा बी टाकल्यापासून कांदा लागवडी पर्यंत शेतकर्‍यांची दमछाक होत आहे. माझा इतका खर्च होऊन या पिकांवर नांगर फिरवण्याची वेळ आली. शासकीय पातळीवर मला न्याय मिळवून देण्यासाठी पिकांचे नुकसान भरपाई मिळावी व तातडीने पंचनामे करण्यात यावे.

- गोकुळ सुभाष तुवर शेतकरी, कारवाडी

मी जवळपास बारा एकर कांदा लागवड केली. त्यात जवळपास अडीच लाख रुपये खर्च झाले.कांद्याची वाढ खुंटली व कांदे करपू लागले. एवढा मोठा खर्च होऊन माझ्या नशिबी संकट आले. त्याला सामोरे जाण्याची ताकत राहिली नाही. त्यामुळे शासकीय पातळीवर नुकसान भरपाई मिळून देण्यासाठी प्रयत्न व्हावेत अशी अपेक्षा आहे.

- मोहन यशवंत घोलप शेतकरी, पुनतगाव

पीक वाचवण्याची पराकाष्ठा

सध्या सगळीकडे शेतजमिनी ओल्या आहे, त्यामुळे बुरशीने पिकांची वाढ खुंटत आहे. पिके पिवळी पडून जमिनी सोडायला तयार नाही. अधूनमधून ढगाळ वातावरणामुळेही पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. शेतकरी अतोनात प्रयत्न करून रासायनिक व सेंद्रिय फवारणीने पिके वाचवण्याची पराकाष्ठा करीत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com