मोठे गाव असूनही पाचेगावला नाही स्वतंत्र तलाठी
तलाठी (File Photo)

मोठे गाव असूनही पाचेगावला नाही स्वतंत्र तलाठी

ग्रामविकास अधिकारी अन् कृषी सहायक; पोलीस पाटील पदही रिक्त || सर्वसामान्य जनतेची होतेय हेळसांड

पाचेगाव |वार्ताहर| Pachegav

नेवासा तालुक्यातील पश्चिमेला असणार्‍या पाचेगाव मध्ये सध्या कायमस्वरूपी शासकीय अधिकारी-कर्मचारी नसल्याने नागरिकांची मोठी हेळसांड होत आहे. या लोकसंख्येने मोठ्या असणार्‍या गावाला स्वतंत्र कामगार तलाठी, कृषी सहायक, ग्रामविकास अधिकारी, प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात डॉक्टर, तेच काय पण गावाला पोलीस पाटील पद देखील रिक्त आहे. यामुळे सर्वात जास्त हेळसांड ही सर्वसामान्य माणसाची होत आहे.

गावाला तलाठी आहे पण त्या तलाठ्यावर तीन अतिरिक्त गावांचा भार दिला आहे. त्यामुळे तलाठी आठवडाभर गावात काम पूर्णवेळ देऊ शकत नाही. आठवड्यातून फक्त दोन दिवस तलाठी गावात येतात.

ग्रामविकास अधिकारी यांच्याबद्दल देखील वेगळी स्थिती नाही. त्यांना देखील इतर गावे आहेत. त्यामुळे ते देखील पूर्ण वेळ गावाला देऊ शकत नाही. कृषि सहाय्यक देखील गावाला आहे, पण त्यांना देखील इतर गावे असल्याकारणाने गावाला काही शासकीय योजनेची माहिती मिळत नाही. गावातील शेतकर्‍यांना शासकिय योजनेचा कोणत्याही फायदा होत नाही. गावात प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आहे पण तेथे कायमस्वरूपी डॉक्टर नाही. विशेष म्हणजे या उपकेंद्राचा कारभार एका सिस्टरच्या भरवश्यावर चालतो.

इतक्या मोठ्या गावाला पोलीस पाटील देखील नाही. पोलीस पाटलाचं पद काही महिन्यांपासून रिक्त आहे. गावामध्ये रोज कोणत्या न कोणत्या कारणावरून तंटे-बखेडे मोठ्या प्रमाणात घडतात. त्यामुळे कोणत्याही प्रकारची भांडणे झाली तर ती लगेच पोलीस ठाण्यामध्ये दाखल होतात. त्यामुळे पोलीस प्रशासनाची लाल दिव्याची गाडी रोजच गावात पाहायला मिळते. गावाला देखील या गाडीची आता सवय झाली आहे. नेवासा तालुक्यात मोठे म्हणून पाचेगावची ओळख असली तरी या गावात समस्या देखील मोठ्याच आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करून गावाला कायमस्वरूपी शासकीय अधिकारी नेमण्यात यावेत अशी मागणी येथील ग्रामस्थ करत आहेत.

Related Stories

No stories found.