पाचेगावच्या शेतकर्‍यांवर लोडशेडींगची संक्रांत !

शेतीला अवघी दोन-तीन तास वीज टिकत असल्याने पिके लागली करपू
पाचेगावच्या शेतकर्‍यांवर लोडशेडींगची संक्रांत !

पाचेगाव |वार्ताहर| Pachegav

नेवासा तालुक्यातील पाचेगाव शिवारात टाकळीभान वीज उपकेंद्रामधून पुरवठा होणार्‍या विजेच्या भारनियमनामुळे शेतकर्‍यांवर संक्रात ओढवली आहे. सध्या उन्हाळ्याची चाहूल लागताच पिकांची पाण्याची भूक वाढली आहे, पण विजेच्या समस्येमुळे परिसरात बर्‍यापैकी पाणी उपलब्ध असताना देखील पिके सुकू लागली आहे. त्यामुळे पाचेगाव परिसरातील शेतकरी हवालदिल झाले आहे.

सध्या या भागात उन्हाळी कांदा, गहू, मका, उसाच्या लागवडी मोठ्या प्रमाणात झाल्या असल्या तरी शेतकरी विजेच्या समस्यांमुळे त्रस्त झाला आहे. थंडी चांगली असली तरी उन्हाचा चटका देखील जास्त प्रमाणात बसत आहे. त्यामुळे पिके पाण्यावर लवकर येत आहे. वीज सुरळीत सुरू राहावी म्हणून परिसरातील बरेचसे वीज रोहित्र बंद केले जात आहे. पण तरीदेखील उर्वरित वीज सुरळीत चालत नाही. त्यामुळे शेतकर्‍यांपुढे समस्या निर्माण झाली आहे.

परिसरातील शेतकर्‍यांना जरी आठ तास वीज देण्यात येत असल्याचे वीज मंडळाकडून कागदोपत्री सांगितले जात असले तरी मात्र शेतकर्‍यांना दिवसातून दोन ते तीन तासाच्या पुढे वीज मिळत नाही. त्यामुळे शेतकर्‍यांना पिके कशी जगवावीत व वाचावे हे समजनासे झाले आहे.

परिसरात जवळपास 65 च्या पुढे वीज रोहित्र आहेत. त्यात वैयक्तिक रोहित्र वेगळे आहे. एक दिवशी जवळपास 14 ते 15 वीजरोहित्र बंद करून देखील उर्वरित वीजरोहित्र सुरळीत सुरु राहत नाही. दोन दिवसात वीज सुरळीत होण्याचे काम सुरू असल्याचे समजले आहे.पाच पाच मिनिटे वीज ये-जा करीत असल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे. सध्या कांदा लागवडी सुरू आहे, मजूर महिला एका दिवसात जवळपास एक एकर कांदा लागवड करातात पण त्याच कांद्याला पाणी द्यायला जवळपास चार ते पाच दिवस लागतात. मग अशात ते कांदा पीक वाचू शकते का? हा देखील मोठा प्रश्न शेतकर्‍यांपुढे निर्माण झाला आहे.

पाचेगाव परिसरासाठी माजी मंत्री, आमदार शंकरराव गडाख यांच्या माध्यमातून नवीन उपकेंद्राला मंजुरी मिळाली आहे. त्या जागेचा देखील सर्व्हे झाला आहे. पण नवीन उपकेंद्र कार्यान्वित होण्यासाठी अजून बराच विलंब लागू शकतो. तोपर्यंत तरी पाचेगाव परिसरातील शेतकर्‍यांना अखंडीत व पूर्णदाबाने वीज देण्यात यावी अशी मागणी परिसरातील शेतकरी करीत आहे. जर दोन ते तीन दिवसांत वीज सुरळीत केली नाही तर कोणतीही पूर्व सूचना न देता रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी वर्गाने दिला आहे.

मी सध्या माझ्या शेतात कांदा, गहू व ऊस लागवड केली आहे. मला क्षेत्र देखील जेमतेम आहे. पण विजेच्या समस्या निर्माण होऊन शेती धंदा मोडकळीस आलेल्या आहे.थोडीफार शेती असून देखील पिके पाण्यावाचून आडवी पडू लागली. त्यामुळे विजेच्या समस्यांनी शेतकर्‍यांच्या अडचणीत अजून भर पडली. त्यामुळे वीज सुरळीतपणे करून शेतकर्‍यांना दिलासा द्यावा.

- पंढरीनाथ शिंदे शेतकरी, पाचेगाव

शेतकर्‍यांपुढे आधीच अनेक समस्या आहे, त्यात अजून विजेची समस्या भेडसावत आहे. शेतकरी उसने पासने करून शेतीतील पिके चांगली आणण्याचा प्रयत्न करतात, पण तीच पिके पाणी असून सुकू लागली तर काय करणार? सध्या कांदा, गहू व ऊस लागवडी पिके कोवळी अवस्थेत आहे. त्यात उन्ह देखील जास्त पडते. त्यामुळे कोवळी पिके पाण्यावर आहे. पण विजेच्या समस्यामुळे लहान कोवळी पिके जळून जात असल्याचे ही दिसून येत आहे.त्यामुळे आठ तास मिळणारी वीज संपूर्ण दाबाने व अखंडित द्यावी.

- अशोक पवार शेतकरी, पाचेगाव

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com