पाचेगाव |वार्ताहर| Pachegav

नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथील कारवाडी भागात यंत्राच्या सहाय्याने ऊस तोडणी सुरू असताना शनिवारी सकाळी बिबट्याचे एक सात-आठ दिवसांचे बछडे आढळून आले.

पाचेगाव येथील बाजीराव कोळसे यांच्या श्रीरामपूर-नेवासा राज्यमार्गावरील हॉटेल अजिंठाच्या पाठीमागे कारवाडी शिवारातील गट नंबर 559 मध्ये बिबट्याचे एक नर जातीचे बछडे आढळून आले. सदर घटनेची माहिती शेतमालक बाजीराव कोळसे यांनी वनविभागाला कळविल्यानंतर नेवाशाचे वन विभागाचे मुश्ताक सय्यद आणि भीमराज पाठक घटनास्थळी दाखल झाले.

हे बछडे सात ते आठ दिवसांचे असल्याचे सांगितले जात आहे. त्याला एका क्रेटमध्ये शेताच्या कडेला ठेवण्यात आले बछड्याची प्रकृती उत्तम असून त्याला मादीच्या ताब्यात देण्यासाठी वनपाल मुश्ताक सय्यद आणि भीमराज पाठक दिवसभर ठाण मांडून होते. सायंकाळी उशिरापर्यंत बछड्याची मादी आलेली नव्हती.

या बिबट्याच्या बछड्यामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिसरात बिबट्याचा संचार असल्याची खात्री झाली असून वनविभागाच्या कर्मचार्यांनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. रात्रीच्यावेळी घराबाहेर पडू नये तसेच शेळ्या, जनावरे सुरक्षित स्थळी हलवावेत असा सल्ला त्यांनी दिला आहे. बिबट्याचा बछडा पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.