file photo
file photo
सार्वमत

पाचेगावात किराणा दुकानाचे शटर फोडून चोरी

Arvind Arkhade

पाचेगाव|वार्ताहर|Pachegav

नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथे गुरुवारी रात्री किराणा दुकान फोडून चोरी केल्याची घटना घटना घडली.

याबाबत माहिती अशी की, गुरुवारी रात्रीच्यावेळी गावातील बाजार तळावरील शिवाजी चिंधे यांच्या मालकीचे किराणा दुकान आज्ञात चोरट्यांनी शटर तोडून फोडून दुकानातून काही किराणा माल चोरीस गेल्याचे तर काही किराणा मालाची नासाडी केल्याचे सकाळी त्यांना दिसून आले.

यापूर्वीही हे दुकान फोडून चोरी झाल्याची घटना घडलेली आहे. विशेष म्हणजे चोरीत शटर फोडण्यासाठी वापरण्यात आलेला लोखंडी गज हा दोन महिन्यांपूर्वी एका मोटारसायकल गॅरेजमधून चोरी गेला होता. त्यामुळे चोर परिसरातील असावेत अशी शंका नागरिक व्यक्त करीत आहेत.

गावातील चोरीचा प्रकार वाढत चालला आहे. यापूर्वी देखील गावातील विविध ठिकाणी घडलेल्या चोरीचा शोध लावावा अशा मागणीचा ठराव ग्रामसभेत मंजूर करून तो पोलीस ठाण्याकडे देण्यात आला होता. पण अद्याप कोणत्याच चोरीचा उलगडा झालेला नाही. त्यामुळे पोलीस ठाण्यात नागरिक तक्रार दाखल करण्यास टाळाटाळ करतात.

मागील आठवड्यातच गावातील एक सरफाचे दुकान फोडण्यात आले होते. त्यावेळी दुकानातून दोन हजार रुपये गेल्याचे सांगण्यात आले होते.

गावातील एका शेतकर्‍याचा पाच अश्वशक्तीचा विद्युतपंप चोरी झाला आहे. शेतकर्‍यांच्या तुषार संच, ठिबकच्या नळ्या, केबल, स्टार्टर, विद्युतपंप चोरीस गेलेले आहेत पण आतापर्यंत पोलीस यंत्रणेला शोध लागलेला नाही.

गावातील चौकात सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यात यावा अशी मागणी देखील व्यापारी वर्गाने स्थानिक ग्रामपंचायतीकडे केली आहे. काही दुकानांचा अपवाद वगळता व्यावसायिकांकडे सीसीटीव्ही नाहीत.

गावातील चोर पकडण्याची जबाबदारी पोलीस खात्याची असली तरी व्यावसायिकांनी आपापल्या दुकानात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. चोर परिसरातील आहे असे कळले आहे. त्याचा बंदोबस्त करण्यासाठी गावामध्ये पोलीस यंत्रणेमार्फत गस्त घालण्यात येणार आहे. चोरांचा लवकरच शोध लावण्याचा प्रयत्न करू.

- रणजित डेरे पोलीस निरीक्षक, नेवासा

गावात ग्रामसुरक्षा दल स्थापन करण्यात आला होता, पण स्थानिक दलात दुकानदारांतील कोणत्याच व्यापार्‍यांचा सहभाग नाही.अशी चर्चा गावातील नागरिक करीत आहेत,त्यामुळे हा ग्रामसुरक्षा दल फक्त कागदावरच आहे की काय अशी नागरिकांत चर्चा आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com