पाचेगाव-गोणेगाव प्रवरा नदीपात्रातून अनधिकृत वाळू उपसा

नेवासा मंडलाधिकारी व पाच तलाठी घटनास्थळी; 200 ब्रास वाळू चोरीचा पंचनामा
पाचेगाव-गोणेगाव प्रवरा नदीपात्रातून अनधिकृत वाळू उपसा
File Photo

पाचेगाव |वार्ताहर| Pachegav

नेवासा तालुक्यातील पश्चिमेला असणारे पाचेगावातील प्रवरा नदी पात्रातील वाळूवर पुलाचे काम करणारे वाहनेच वाळूवर डल्ला मारतात.

या घटनेची माहिती मिळताच नेवासा खुर्द येथील मंडल अधिकारी व नेवासा खुर्द, पाचेगाव, खुपटी, प्रवरासंगम येथील तलाठी यांनी घटनास्थळी धाव घेऊन नदीपात्रातील अनधिकृतपणे वाळू उपसा करणारा पोकलेन पकडण्यात आला आहे, पण जेसीबी व वाळूने भरलेला डंपर मात्र पसार झाला. पकडलेला पोकलेन गोणेगाव येथील पोलीस पाटील सुधाकर काळे यांच्या वस्तीवर बुधवारी रात्री सुरक्षित ठेवण्यात आला आहे. ग्रामस्थ आज या वाहनांवर महसूल विभाग काय कारवाई करणार, या गोष्टीकडे लक्ष ठेवून आहे.

गेल्या अडीच वर्षांपासून पाचेगाव प्रवरा नदीवर पुलाचे काम चालू आहे, हे काम शेवटच्या टप्प्यात असून पुलाच्या कामासाठी भाडेतत्त्वावर पोकलेन, जेसीबी व डंपर आहे. पण दिवस भरातील काम संपल्यानंतर मात्र हे वाहने प्रवरा नदीतील वाळू वर डल्ला मारत असल्याची खबर महसूल यंत्रणेला कळाली. त्या अनुषंगाने महसूल विभागाच्या कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेऊन बुधवारी सायंकाळी ही मोठी कारवाई केली.

सदर वाहने हे पुलाच्या कामासाठी भाडेतत्त्वावर आणली आहे, असे पुलाच्या कॉन्ट्रॅक्टरकडून सांगण्यात येत आहे. पण हे वाहने जरी भाडेतत्त्वावर आणली असली तरी हे वाहने नेमके कोणाची हा देखील मोठा प्रश्न निर्माण होत आहे. या वाहनांना वाळू तस्करी करण्यासाठी कोणी सांगितले, वाळू नेमकी कुठे टाकली जात आहे, असे किती निरुत्तर प्रश्न आज या ग्रामस्थांना पडले आहे.

सदर कारवाई दरम्यान नेवासा खुर्द येथील लवांडे, नेवासा खुर्दचे तलाठी खंडागळे, प्रवरासंगमचे तलाठी म्हसे, खुपटी येथील घुमरे तलाठी, पाचेगाव येथील तलाठी राहुल साठे व गोणेगाव, पाचेगाव येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पाचेगाव हे वाळू रोखण्यासाठी कायमस्वरूपी तत्पर आहे, यांनी वाळू भरलेली वाहने देखील याअगोदर महसूल व पोलीस प्रशासनाच्या ताब्यात पकडून दिलेली आहे. पाण्यात वाळू वाहून नेणार्‍या तराफा देखील जाळून नष्ट केलेला आहे. या अगोदर पोलीस व महसूल खात्याला या गावातील ग्रामस्थांनी मदतच केली आहे. त्याची पुनरावृत्ती या ग्रामस्थांनी पुन्हा एकदा केली आहे. त्यामुळे तब्बल 200 ब्रास वाळूची इतकी मोठी कारवाई यावेळी प्रशासनाने केली आहे. मात्र आता ग्रामस्थांच्या या वाहनांवर काय कारवाई होणार, यांच्यावर किती दंड आकारण्यात येणार, या गोष्टीकडे लक्ष लागून आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com