पाचेगावच्या एका शेतकर्‍याच्या सोयाबीनला अडीचशेपर्यंत शेंगा

पाचेगावच्या एका शेतकर्‍याच्या सोयाबीनला अडीचशेपर्यंत शेंगा

पाचेगाव |वार्ताहर| Pachegav

नेवासा तालुक्यातील पाचेगावमध्ये यंदा प्रथमच मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिक घेतले असून मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला असला तरी येथील एका शेतकर्‍याने घेतलेल्या सोयाबीनच्या झाडाला 230 ते अडीचशेपर्यंत शेंगा लागल्या आहेत. एकरी 17 क्विंटल उत्पादन होण्याचा अंदाज असून नियोजनपूर्वक चांगले पिक उत्पादन घेतल्याबद्दल या शेतकर्‍याचे परिसरात कौतुक होत आहे.

याबाबत माहिती अशी की, पाचेगाव परिसरात यावर्षी 9305, फुले संगम व अन्य काही सोयाबीन वाणाची मोठ्या प्रमाणात पेरणी झाली. जिल्ह्यात व तालुक्यात बर्‍याच ठिकाणी सोयाबीन पिकांवर मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला. त्यात फुले संगम या वाणावर हा रोग जास्त प्रमाणात दिसून आला. पण पाचेगाव येथील भाऊसाहेब रामचंद्र पडोळ या शेतकर्‍यांनी या परिस्थितीतही चांगले पिक आणले.

श्री. पडोळ यांनी आपल्या दीड एकर क्षेत्रावर दोनफुटी पद्धतीने पेरणी केली. त्यात त्या क्षेत्राकरिता फक्त पंचवीस किलो बियाणे पेरणीसाठी लागले. पेरणी नंतर चोवीस तासाच्या आत तणनाशक फवारणी केली. त्यामुळे त्यांच्या सोयाबीन क्षेत्रात तण देखील कमी आले. त्यानंतर दोनफुटी सोयाबीन केल्यामुळे मजूर न लावता बैल मशागत केली. बैल मशागती मुळे सरी पडून सोयाबीन पिकाला माती लागली व जास्त पाण्याचा देखील सोयाबीन वर परिणाम झाला नाही.

त्यांच्या सोयाबीन पिकांवर कोणत्याही प्रकारचा रोग दिसून आला नाही. 26 जून रोजी त्यांनी पेरणी केली. आता जवळपास तीन ते साडेतीन फूट उंचीची झाडे असून जवळपास 230 ते 250 शेंगा प्रत्येक झाडाला लागलेल्या आहेत. शेंगांच्या या संख्येमुळे त्यांना एकरी उत्पादन 17ते 19 क्विंटल उत्पादन अपेक्षित आहे. यावेळी त्यांचे मोठे बंधू रंगनाथ पडोळ व मुलगा ज्ञानेश्वर पडोळ हे उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com