पाचेगाव परिसरात वीज समस्या वाढल्या

कर्मचारी त्वरीत नियुक्त करण्याची मागणी
पाचेगाव परिसरात वीज समस्या वाढल्या

पाचेगाव |वार्ताहर| Pachegav

नेवासा तालुक्यातील पाचेगाव, पुनतगाव परिसरात महावितरण विभागाचा कर्मचारी नसल्याने अनेक वाहिन्यांवरील विजेच्या समस्या मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहे. या भागात महावितरणने तात्काळ कर्मचारी नियुक्त करावा ,अशी मागणी शेतकर्‍यांनी तसेच घरगुती वीज ग्राहकांनी केली आहे.

सध्या पावसाळा सुरू असल्यामुळे या परिसरात वारंवार शेती वाहिनी तसेच सिंगल फेज वाहिनीवरील वीज गूल होत आहे. या दररोजच्या समस्यांना ग्राहक वैतागले असून शेती व सिंगल फेज वाहिनीवर बिघाड होणे, तारा तुटणे तसेच पाचेगाव गावठाण परिसरात तारा तुटणे, रोहित्रात बिघाड होणे, केबल जळणे आदी समस्या नेहमी निर्माण होत आहेत.

गेल्या जुलै महिन्यात येथील कर्मचार्‍यांची श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथे बदली झाल्याने या भागात महावितरणने अद्याप नवीन कर्मचार्‍याची नियुक्ती केली नाही. ग्राहक स्वतःचा जीव धोक्यात घालून विजेच्या समस्या सोडवत आहेत. महावितरणने कोणतीही जीवितहानी होऊ नये यासाठी तात्काळ कर्मचार्‍याची नियुक्ती करावी, अशी मागणी शेतकर्‍यांनी तसेच ग्राहकांनी केली आहे.

पाचेगावातील पंधरा नागरिकांनी घरगुतीसाठी कनेक्शन मिळावे याकरिता चार ते पाच वर्षांपासून महावितरणकडे मागणी केली होती. पण अजून या नागरिकांना घरगुती कनेक्शन दिले तर नाहीच उलट वीज बिल पाठवून आपल्या भोंगळ कारभाराचे दर्शन घडवले. येथे एका वायरमनची लवकर नेमणूक करण्यात यावी, अशी मागणी येथील नागरिक करीत आहेत.

कमी दाबाने विद्युत पुरवठा होत असल्याने मी वैयक्तिक दहा हजार रुपये खर्च करून माझ्याकरिता 16 एच पी क्षमतेचे विद्युत रोहित्र घेतले. सुरुवातीला चांगले चालले पण गेली तीन महिन्यांपासून रोहित्र जळाले. ते तसेच बंद अवस्थेत आहे. त्यामुळे माझा विद्युतपंप देखील बंद आहे. वारंवार तक्रारी करून देखील अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देतात. शिवाय बंद कालावधीत मला तीन महिन्यांचे तीन हजार दोनशे रुपये बिल आकारण्यात आले आहे.

- ज्ञानेश्वर संपत जाधव शेतकरी, पाचेगाव

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com