पाचेगाव बंधार्‍यातून होतेय मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती

पाच वर्षात अनेकदा प्रस्ताव पाठवूनही निधी उपलब्ध होत नसल्याबद्दल नाराजी
पाचेगाव बंधार्‍यातून होतेय मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती

पाचेगाव |वार्ताहर| Pachegav

नेवासा तालुक्यातील (Newasa Taluka) पाचेगाव (Pachegav), पुनतगाव (Punatgav) व मध्यमेश्वर (Madhyameshwar) या तीनही कोल्हापूर (Kolhapur) पद्धतीने बांधण्यात आलेल्या बंधार्‍यातून पाण्याची मोठी गळती (Large leakage of water from the dam) होत आहे. याकरिता गेल्या पाच वर्षांपासून शेतकर्‍यांची बंधार्‍याच्या दुरुस्तीसाठी निधी (Funds for repair of levees) उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली मात्र प्रत्यक्षात निधी उपलब्ध न झाल्याने पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती सुरुच आहे.

पाचेगाव बंधारा (Pachegav Dam) हा तालुक्यात सर्वात जास्त 154 दशलक्ष घनफुट क्षमतेचा आहे. हा बंधारा सन 1985 साली माजी आमदार संभाजी फाटके यांच्या विशेष प्रयत्नात मंजूर करून बांधण्यात आला होता. पण आता मुळा (Mula) आणि प्रवरा नदीवरील (Pravara River) या बंधार्‍यांची दुर्दशा झाली आहे. बंधार्‍याच्या पायथ्याशी दगड निखळून पडले असून मोठमोठे बोगदे तयार झाले आहे. त्यातून मोठ्या प्रमाणात पाणी गळती (Water leak) होत आहे. त्यामुळे बंधार्‍यात जास्त काळ पाणी टिकून राहत नाही. त्यामुळे शेतकरी गेल्या पाच वर्षांपासून या दुरुस्तीच्या कामासाठी निधी मिळावा म्हणून जलसंपदा विभागाकडे (Department of Water Resources) मागणी करीत आहे.

या बंधार्‍याचा पाच ते सहा गावांना फायदा होतो. त्यात पाचेगाव (Pachegav), निंभारी, गोणेगाव, इमामपूर, पुनतगावचा काही भाग, राहुरी तालुक्यातील (Rahuri Taluka) तिळापूर या गावांना सर्वाधिक फायदा होतो. पण मोठ्या प्रमाणात होणार्‍या पाणी गळती मुळे शेतकरी हैराण झाले आहे.

शासनाकडून पाणी अडविण्यासाठी मोठा निधी मंजूर करण्यात येतो, मग हा निधी जातो कुठे? हा प्रश्न देखील शेतकर्‍यांना भेडसावत आहे. बंधार्‍याच्या पिना टाकण्यापासून तर लिकेज थांबविण्याकरिता लागणारी सर्व सामुग्री लाभार्थी शेतकरीच करतात. आता बंधार्‍यात पाणी पातळी चांगली आहे व भविष्यात म्हणजे संपूर्ण उन्हाळ्यात पाणी टिकून राहण्यासाठी येथील शेतकरी वर्गणी गोळा करून पाणी गळती थांबविण्याकरिता प्रयत्न करीत आहे.

त्यामुळे शेतकर्‍यांची हालअपेष्टा थांबविण्यासाठी जलसंपदा विभागाने तातडीने परत नवा सहावा प्रस्ताव तयार करून वरील पातळीवर सादर करावा व निधी मंजूर करून बंधार्‍याच्या कामासाठी तातडीने मदत करावी अशी अपेक्षा पाचेगाव, निंभारी, गोणेगाव, इमामपूर या भागातील लाभार्थी शेतकरी करीत आहे.

आम्ही परत एकदा नव्याने सुधारित प्रस्ताव तयार करून पाठवला आहे. तो प्रस्ताव सध्या नाशिक येथील जलसंपदा कार्यलयात आहे. पाचेगाव, पुनतगाव व मध्यमेश्वर या तीन बंधार्‍याचा दुरुस्ती हा आराखडा तयार करून वरील पातळीवर पाठवला असून लवकरच म्हणजे यावर्षी निधी उपलब्ध होऊन या तिन्ही बंधार्‍यांची दुरुस्ती लवकरच करण्यात येईल.

- महेश शेळके शाखा प्रमुख बेलपिंपळगाव जलसंपदा विभाग

आज रोजी पाचेगाव बंधारा पाण्याने जरी भरलेला असला तरी बंधार्‍याच्या पायथ्याशी मोठे दगड निखळून पडले, त्यातून पाण्याची मोठी गळती होत आहे. बंधार्‍याच्या गुरुतूनही पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती होते. याच्या अगोदर देखील शेतकर्‍यांनी पाणी गळती थांबविण्यासाठी जलसंपदा विभागाच्या अधिकार्‍यांच्या निदर्शनास आणून दिले होते. पण गेल्या पाच वर्षांपासून पक्त आणि प्रस्ताव सादर करण्यात येत आहे. यासाठी निधी उपलब्ध का होत नाही हा शेतकर्‍यांना पडलेला प्रश्न आहे.

- बाळासाहेब भिकाभाऊ शिंदे संचालक, अशोक कारखाना पाचेगाव

मंत्रालयातून निधी आणा; अधिकार्‍यांचा सल्ला

श्रीरामपूर येथील जलसंपदा उपविभागीय अधिकारी यांच्याबरोबर फोनद्वारे संपर्क केला असता ते म्हणाले की हा कितीवा प्रस्ताव आहे हे मला माहिती नाही. मंत्रालयात जाऊन बंधार्‍याच्या दुरुस्ती साठी निधी उपलब्ध करून आणा असा सल्ला दिला. अधिकार्‍यांच्या या उत्तराबद्दल शेतकर्‍यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com