ऑक्सिजन प्लॅट चालकांकडून खाजगी हॉस्पिटलची अडवणूक

जादा पैसे घेत असल्याची मनपा आरोग्य समितीच्या बैठकीत तक्रार
ऑक्सिजन प्लॅट चालकांकडून खाजगी हॉस्पिटलची अडवणूक
File Photo

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

अतिगंभीर रुग्णांसाठी आवश्यक असणारा ऑक्सिजन घेताना खाजगी प्लँटवाल्यांकडून जादा पैसे घेतले जातात, अशी तक्रार खाजगी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी महापालिकेच्या आरोग्य समितीकडे केली. त्यावर जिल्हाधिकार्‍यांशी चर्चा करून यावर मार्ग काढू असे, आश्वासन या डॉक्टरांना देण्यात आले. बिलाअभावी कोविड मृतदेह अडवू नका. करोनाच्या संकटाकडे संधी म्हणून नव्हे, तर सेवा म्हणून पहा, असे आवाहन समितीचे अध्यक्ष डॉ. सागर बोरुडे यांनी खासगी हॉस्पिटलच्या डॉक्टरांना केले.

महापौर बाबासाहेब वाकळे, समितीचे अध्यक्ष नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, सदस्य निखील वारे, सचिन जाधव, सतीश शिंदे, संजय ढोणे यांच्या उपस्थितीत महापालिकेत गुरूवारी शहरातील खासगी डॉक्टर व त्यांच्या प्रतिनिधीची बैठक पार पडली. या बैठकीत डॉक्टरांच्या अडचणी समजून घेण्यात आल्या. तसेच पैशाअभावी कोणाची अडवणूक करू नका असे आवाहनही करण्यात आले.

रूग्णालयांकडून अतिरिक्त शुल्क आकारणी होत असल्याचा विषयही बैठकीत निघाला. मात्र, शासनाचे दर आणि त्याशिवाय होणारे उपचार याचा विचार करूनच रुग्णालये बिल आकारणी करते, असे स्पष्ट करत खासगी हॉस्पिटलच्या डॉक्टरांकडून ऑक्सिजनसाठी खासगी प्लँटवाले जादा पैसे घेऊन अडवणूक करतात, असा आरोप केला. तत्काळ ऑक्सिजन हवा असेल तर आणखी जादा पैसे घेतात, अशी तक्रार केली.

बैठकीतूनच प्लॅट मालकांकडे याबाबत विचारणा झाली, त्यावेळी लिक्वीड गॅस कमी येत असल्याचे कारण पुढे करण्यात आले. रेमडेसिवीर इंजेक्शनची अजूनही गरज आहे. ते पुरेसे मिळावेत, अशी मागणी डॉक्टरांनी केली. महापालिकेने हॉस्पिटलला लावलेले कर कमी केले तर रुग्णांना बिलात आणखी सवलत देता येणे शक्य असल्याचा मुद्दाही बैठकीत चर्चेला आला.

म्युकरमायकोसिस रुग्णांविषयी चर्चा

जिल्ह्यामध्ये करोना विषाणूच्या रूग्णांबरोबर आता म्युकरमायकोसिसचे रूग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहे. याची माहिती महापालिकेकडे असणे गरजेचे आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करू, करोनाची तिसरी लाट येणार असल्याचे तज्ञ सांगत आहे. यामध्ये सर्वाधिक लहान मुले बाधित होणार असल्याचा निकष समोर आला आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी लवकरच महापालिका बालरोग तज्ज्ञांची बैठक घेऊन उपाययोजना केल्या जातील असे महापौर बाबासाहेब वाकळे यांनी सांगितले.

ऑक्सिजन प्लँटसाठी तीन जागांची पाहणी

महापालिका स्वत:चा ऑक्सिजन प्लँट उभा करणार आहे. त्यासाठी सावेडी गावातील जागा, जुना कोंडवाडा आणि सावेडीतीलच कचरा डेपोच्या जागेची पाहणी करण्यात आली. त्यातील कचरा डेपोच्या जागेला प्राधान्य देण्यात येत आहे. हा प्लँट उभारण्यासाठी प्रकल्प प्रमुख म्हणून अभियंता परिमल निकम यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच ऑक्सिजन बेडचे कोविड सेंटर सुरू करण्यात येणार असून त्याची जबाबदारी अभियंता राजेंद्र मेहेत्रे यांच्यावर समितीने सोपविली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com