कोपरगावात ऑक्सिजन प्लँटचे काम सुरु : आ. काळे

कोपरगावात ऑक्सिजन प्लँटचे काम सुरु : आ. काळे

कोपरगाव (प्रतिनिधी) -

करोनाच्या दुसर्‍या लाटेत हजारो नागरिकांना कोरोनाची बाधा होवून अनेक बाधित रुग्णांना ऑक्सिजन बेडची आवश्यकता भासत होती. मात्र देशासह राज्यात ऑक्सिजनची निर्मिती मर्यादित असल्यामुळे अनेक बाधित रुग्णांना वेळेवर ऑक्सिजन बेड उपलब्ध न झाल्यामुळे जीव गमवावा लागला. त्यामुळे जिल्ह्याचे पालक मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे ऑक्सिजन प्लँट उभारण्यासाठी निधी मिळावा यासाठी पाठपुरावा सुरु होता. त्या पाठपुराव्यातून कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाजवळ 1.53 कोटीच्या ऑक्सिजन प्लँटचे काम सुरु झाले असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे.

दोन महिन्यापासून कोपरगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात करोना बाधित रुग्णांची संख्या वाढली असून काही गंभीर रुग्णांना श्‍वास घेण्यात त्रास होत असल्यामुळे असे रुग्ण कोपरगाव ग्रामीण रुग्णालय, एस.एस.जी.एम. कोविड केअर सेंटर तसेच ज्या रुग्णालयात ऑक्सिजन सुविधा उपलब्ध आहे अशा खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. यापूर्वी कधीही अशा प्रकारची ऑक्सिजनची आवश्यकता भासली नसल्यामुळे उद्योग व्यवसायांना पुरवून आरोग्य विभागाला लागणारा ऑक्सिजन पुरवठा केला जात होता.

ऑक्सिजनच्या मागणीप्रमाणे पुरवठा होत असल्यामुळे देशासह राज्यात ऑक्सिजन उत्पादन मर्यादित होते. मात्र करोनाच्या दुसर्‍या लाटेत बाधित रुग्णांची संख्या वाढली त्याप्रमाणेच आरोग्य विभागाला देखील मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची आवश्यकता भासत होती. बाधित रुग्णांची ऑक्सिजनची बेडची मागणी दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे न भूतो न भविष्यती असा ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला होता.

कोपरगाव तालुक्याची देखील ऑक्सिजनची मागणी मोठी होती. मात्र त्याप्रमाणात पुरवठा होत नसल्यामुळे आरोग्य व्यवस्था अडचणीत आली होती. कोपरगाव विधानसभा मतदार संघात जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून ऑक्सिजन प्लँटसाठी निधी मिळावा यासाठी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे वारंवार मागणी केली होती. त्या मागणीची दखल घेवून ना. मुश्रीफ यांनी कोपरगाव विधानसभा मतदार संघासाठी ऑक्सिजन प्लँट उभारण्यासाठी मंजुरी दिली आहे.

या ऑक्सिजन प्लँटसाठी 1 कोटी 53 लाख 4 हजार रुपये खर्च अपेक्षित असून प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली आहे. या ऑक्सिजन प्लँट उभारणीचे फायरवेल टेक्नॉलॉजी बारामती हि कंपनी काम करीत असून एक ते दीड महिन्यात ऑक्सिजन प्लँट काम पूर्ण होणार आहे. हा ऑक्सिजन प्लँट कार्यान्वित झाल्यानंतर नियमितपणे 125 ऑक्सिजन सिलेंडरचे उत्पादन होणार आहे. त्यातून कोपरगाव विधानसभा मतदार संघात निर्माण झालेला ऑक्सिजनचा तुटवडा दूर होणार असून त्यामुळे ऑक्सिजन अभावी होत असलेले मृत्युदर कमी होण्यास मदत होणार असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी म्हटले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com