अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

करोना रूग्णांची संख्या वाढत असल्याने ऑक्सिजनचा तुटवडा जाणवू लागला आहे.

हळूहळू औद्यगिक क्षेत्र पूर्वपदावर येत असतानाच उद्योजकांसमोर नवीन संकट उभे ठाकले आहे. कारखानदारांना लागणारे ऑक्सिजन सिलेंटर कमी पडून न देता उपलब्ध करावे, अन्यथा ऑक्सिजन अभावी कारखाने बंद ठेवावी लागतील. परिणामी कामगार बेरोजगार होतील, असे निवेदन आमी संघटनेने दिले आहे.

आमी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कटारिया, पदाधिकारी व सदस्यांच्या शिष्टमंडळाने सरकारला निवेदन दिले आहे. तत्पूर्वी अन्न व औषध प्रशासन सहाय्यक आयुक्त राठोड, जिल्हा उद्योग केंद्राचे गवळी व आमी संघटनेचे पदाधिकारी यांच्यात ऑक्सिजनसंदर्भात बैठक होऊन यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

या बैठकीस आमी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कटारिया, संजय बंदिष्टी, हरिष आला, अशोक सोनवणे, मिलिंद कुलकर्णी, विजय भगत. नासीर शेख, गणेश कोलार, प्रफुल्ल नातू, प्रदीप डुंगरवाल, लोढा, शिंदे, सागर जाधव, साळवे, सुशांत गांधी, राहुल लोढा, संदेश पिंपळकर, दीपक नागरगोजे, क्षितीज झावरे, देशमुख, इंडियन सीमलेसचे प्रतिनिधी उपस्थित होते.

टप्याटप्याने अनलॉकच्या दिशेने पाऊल टाकत देश पूर्वपदावर येत आहे. औद्योगिक क्षेत्राला देखील नवसंजीवनी मिळावी, म्हणून केंद्राने व राज्याने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यांचे काटेकोर पालन करीत कारखानदार पूर्वपदावर येत आहेत. असे असताना उद्योजकांसमोर एक नवीन संकट उभे ठाकले आहे.

कारखानदारांना मटेरियल व लेझर कटिंग आणि इतर अनेक गोष्टींसाठी ऑक्सिजन लागते. परंतु आरोग्य क्षेत्रात ऑक्सिजनची मागणी वाढली असून, ऑक्सिजन अत्यावश्यक गरज झाली आहे. याच्याशी आमी संघटना सहमत आहे व पूर्ण सहकार्य करीत आहे. परंतु केंद्राच्या नियमानुसार आरोग्यासाठी 80 टक्के व औद्योगिकसाठी 20 टक्के ऑक्सिजन पुरवठा करावा, असे ऑक्सिजन उत्पादकांना परिपत्रकाद्वारे व शासनाच्या संबंधित विभागाला कळविण्यात आले आहे.

वैद्यकीय क्षेत्रास लागणारा ऑक्सिजन पुरवठा करणारी यंत्रणा व उत्पादक यांच्यातील काही त्रुटी असाव्यात किंवा उपलब्ध असताना अतिरिक्त साठा होत नाही ना? काही काळाबाजार होत नाही ना? या सर्व बाबींची शासनस्तरावर चौकशी करून आम्हा कारखानदारांना गरजेचा असणारा ऑक्सिजन सिलेंडर वैद्यकीय क्षेत्राला कमी न पडू देता उपलब्ध करून द्यावा व कारखानदारांना न्याय द्यावा. अन्यथा ऑक्सिजनअभावी उद्योजकांना कारखाने बंद ठेवावे लागतील, असेही म्हटले आहे.