ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाच्या संनियंत्रणांसाठी 6 पथकांची नियुक्ती

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाच्या संनियंत्रणांसाठी 6 पथकांची नियुक्ती

जिल्हाधिकार्‍यांनी जारी केले आदेश

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यातील करोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी प्रशासन अहोरात्र कार्यरत आहे. जिल्ह्यातील रुग्णांसाठी लागणारी ऑक्सिजनची गरज आणि उपलब्धता यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी ऑक्सिजनचा पर्याप्त वापर सुयोग्य पद्धतीने नियंत्रित करण्यासाठी सहा पथकांची नियुक्ती केली आहे. तसेच, यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी नोडल अधिकारी व रिफिलर प्लांटधारक यांची संयुक्त बैठक घेऊन यासंदर्भात सूचना केल्या.

जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी आता जिल्ह्यातील ऑक्सिजनचा सुयोग्य वापर होण्यासाठी आणि जिल्ह्यातील ऑक्सिजन रिफीलर यांच्याकडून फक्त वैद्यकीय, औषधी कारणासाठी ऑक्सिजनचा वापर व्हावा, यावर नियंत्रणासाठी पथकांची नियुक्ती केली आहे. जिल्ह्यात अहमदनगर इंडस्ट्रीयल गॅस प्लांटसाठी रिपोर्टिंग ऑफीसर म्हणून उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) पल्लवी निर्मळ तर इनचार्ज ऑफिसर म्हणून सहायक पुरवठा अधिकारी किशोर कदम आणि नायब तहसीलदार (नेवासा) डी.एम. भावले यांची नियुक्ती केली आहे.

या प्लान्टमधील ऑक्सीजन निर्मिती नियंत्रणासाठी तीन पथके कार्यरत असतील. हायटेक एअर प्रोडक्टस् (एमआयडीसी, ) येथील प्लँटवरील ऑक्सिजन निर्मिती व नियंत्रणासंदर्भात रिपोर्टिंग ऑफीसर म्हणून उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) उज्ज्वला गाडेकर आणि इनचार्ज ऑफीसर म्हणून तहसीलदार (पुनर्वसन) वारुळे आणि नायब तहसीलदार (गृह शाखा) राजू दिवाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या अखत्यारित ही तीन पथके कार्यरत असतील. यासंदर्भात संबंधित पथकांना जबाबदारी नेमून देण्यात आली आहे.

या पथकांनी त्यांना दिलेल्या वेळेनुसार तेथे उपस्थित राहून संनियंत्रण करावयाचे आहे. याबाबत जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांच्या निर्देशानुसार, निवासी उपजिल्हाधिकारी निचित यांनी रिफीलर आणि नोडल अधिकारी तसेच जबाबदारी सोपविण्यात आलेल्या पथकातील अधिकारी-कर्मचारी यांची बैठक घेऊन त्यांना सूचना दिल्या. ऑक्सिजन रिफिलर यांचेकडून गैर वैद्यकीय कारणासाठी ऑक्सिजन पुरवठा होत असल्यास आवश्यक ती कारवाई करणे, ऑक्सिजन रिफिलर यांचेकडून वितरण झालेल्या हॉस्पिटलच्या नोंदी ठेवणे, तसेच उपलब्ध करून देण्यात आलेली ऑक्सिजनची मात्रा याबाबतही नोंदी ठेवणे, रिफिलिंग प्लांट वरून निघालेला ऑक्सीजन वितरण करावयाच्या हॉस्पिटलला पूर्ण क्षमतेने प्राप्त झाल्याबद्दल खात्री करणे आदी कामे या पथकाकडे सोपवण्यात आली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com