प्राणवायूसाठी जिल्हा प्रशासनाचे प्राण कंठाला

29 मेट्रीक टन ऑक्सिजन मिळाला आणखी 19 मेट्रीक टन मिळणार
File Photo
File Photo

अहमदनगर |प्रतिनिधी|Ahmednagar

जिल्ह्यातील वाढता करोना संसर्ग आणि अत्यवस्थ रुग्णांवर उपचार करतांना आवश्यक असणार्‍या ऑक्सिजनसाठी प्रशासनाचे प्राण कंठाला आल्याची स्थिती निर्माण झाली आहे.

जिल्ह्यातील करोना रुग्णांसाठी दररोज 60 मेट्रीक टन ऑक्सिजनची गरज असताना बुधवारी पहाटे 19 आणि त्यानंतर 10 मेट्रीक टन असा 29 मेट्रीक टन ऑक्सिजन मिळाला आहे. तर रात्री उशीरपुन्हा 19 मेट्रीक टन ऑक्सिजन येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

दरम्यान, बुधवारी पहाटे नगरमध्ये ऑक्सिजन आल्याने अनेक खासगी रुग्णालयासह जिल्हा रुग्णालयातील करोना रुग्णांचे प्राण वाचले आहेत. मात्र, असे असले तरी दररोज आवश्यक असणारा ऑक्सिजन आणि होणारा पुरवठा यात तफावत असल्याने जिल्हा प्रशासन आणि करोना उपचार करणार्‍या रुग्णालयाना आता प्राण वायूसाठी दररोज लढा द्यावा लागणर असल्याचे सुत्रांनी सांगितले. जोपर्यंत राज्याच्या मागणीच्या प्रमाणात ऑक्सिजनचे उत्पादन होणार नाही, तोपर्यंत अशीच स्थिती राहणार असल्याचे सांगण्यात आले.

मंगळवारी नगर शहरातील खासगी करोना रुग्णालयातील ऑक्सिजन साठा काही तासासाठी शिल्लक असल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधीत रुग्णालयाच्या डॉक्टरांनी जिल्हा प्रशासनाकडे धाव घेतली. जिल्हा प्रशासनाने तातडीने उपाय योजना करत काही हॉस्पिटला जिल्हा रुग्णालयातील शिल्लक असणार्‍या साठ्यातून आक्सिजन उपलब्ध करून दिला.

तर काही हॉस्पिटल यांना नगर एमआयडीसीमधील बंद असणार्‍या कंपन्यांतून ऑक्सिजनचे सिलेंडर उपलब्ध करून देण्यात आले. त्यानंतर चाकण येथून नगरसाठी निघालेल्या ऑक्सिजन टँकरला मंगळवारी रात्री उशीरा पुणे प्रशासनाने थांबविले. अखरे वरिष्ठ पातळीवरून यात हस्तक्षेप झाल्याने अखेर नगरचा टँकर बुधवारी पहाटे नगरमध्ये पोहचला. यातील निम्मा टँकर जिल्हा रुग्णालयात खाली करून उर्वरित एमआयडीसीमधील गॅस एजन्सीकडे पाठविण्यात आला. हा टँकर 19 मेट्रीक टन होता. त्यानंतर बुधवारी दुपारपर्यंत आणखी 10 मेट्रीक टनचा टँकर नगरमध्ये आला आहे. तर बुधवारी रात्री उशीरा आणखी 19 मेट्रीक टनाचा ऑक्सिजनचा टँकर नगरमध्ये येणार असल्याची माहिती ऑक्सिजन नियोजनच्या नोडल अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी पल्लवी निर्मल यांनी दिली.

दरम्यान, जिल्ह्याची दररोजची मागणी 60 मेट्रीक टनाची असून त्यासाठी दररोज राज्य पातळीवर पाठपुरावा करावा लागणार असल्याचे जिल्हा शासनाकडून सांगण्यात आले. जिल्ह्यातील ऑक्सिजनचा होणारा पुरवठा, नियोजन, वितरण याबाबत बुधवारी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भासले यांनी बैठक घेतली. याबैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, सर्व नोडल अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखर्णा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे आदी उपस्थित होते.

बुधवारी दिवसभर आणि रात्री उशीरापर्यंत नगरसाठी 48 मेट्रीक टन ऑक्सिजनचा पुरवठा झालेला आहे. यासह स्वतंत्रपणे साईदिप, नोबल आणि विळद घाट येथील हॉस्पिटला यांचा साठा बुधवारी आलेला आहे. या हॉस्पिटलला मिळणार्‍या साठ्याची माहिती आणि नोंद जिल्हा प्रशासनाकडे नसून राज्य पातळीवरून स्वतंत्रपणे या हॉस्पिटलच्या कोठ्या प्रमाणे त्यांना हॉस्पिटलचा पुरवठा होत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com