ऑक्सिजन बेडअभावी महिलेचा संगमनेरात अंत

व्हेंटिलेटर रुग्णवाहिका चालकांची झुंज अपयशी
ऑक्सिजन बेडअभावी महिलेचा संगमनेरात अंत

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangmner

प्रशासकीय अधिकारी व राजकीय पदाधिकार्‍यांनी कितीही गाजावाजा करून सांगितले असले तरी संगमनेर शहरात मात्र अद्यापही पुरेशी वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्याचे स्पष्ट झाले आहे. करोनामुळे मृत्यूशी झुंज देत असलेल्या भंडारदर्‍याच्या इंदुबाई नामक एका महिलेला शहरात एकाही दवाखान्यात ऑक्सीजन बेड मिळाले नाही.

ऑक्सिजन अभावी तडफडणार्‍या या महिलेला वाचविण्यासाठी काही रुग्णवाहिका चालकांनी भर रस्त्यावरच व्हेंटिलेटर लावले. मध्यरात्री तिला एका दवाखान्यात जागाही मिळाली मात्र तोपर्यंत तिचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. रुग्णवाहिका चालक व काही युवकांनी सदर महिलेला वाचविण्यासाठी जिवाचा आटापिटा केला. मात्र त्यांचे प्रयत्न निष्फल ठरले. ही घटना शुक्रवारी रात्री संगमनेर शहरात घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, भंडारदरा येथील पन्नास वर्षे वयाच्या इंदुबाई नामक महिलेला करोना झाला होता. हा आजार खूपच वाढल्याने तिला शुक्रवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास संगमनेरात उपचारासाठी आणण्यात आले. तिच्या नातेवाईकांनी शहरातील सर्व दवाखाने पालथे घातले मात्र एकाही रुग्णालयात तिला जागा उपलब्ध झाली नाही. ऑक्सिजन बेड नाही असे कारण सांगून शहरातील एकाही डॉक्टरने तिला आपल्या दवाखान्यात उपचारासाठी दाखल करून घेतले नाही.

या महिलेला श्वासाचा खूपच त्रास सुरू झाला. काय करावं असा प्रश्न तिच्या नातेवाईकांच्या मनात निर्माण झाला. रात्री आठ वाजेच्या सुमारास या महिलेची प्रकृती आणखी खालावली. ज्या रुग्णवाहिकेतून तिला आणण्यात आले होते त्या रुग्णवाहिका चालकाला तिच्या आजाराचे गांभीर्य लक्षात आले. त्याने तातडीने पावले उचलली. शहरातील नवीन नगर रस्त्यावर एका बाजूला रुग्णवाहिका त्याने लावली. रुग्णवाहिकेत असलेला ऑक्सिजन सदर महिलेला पुरविण्यात आला या रुग्णवाहिका चालकाने त्वरीत आपल्या इतर रुग्णवाहिका चालक मित्रांना बोलावून घेतले. त्यांनीही आपल्या रुग्णवाहिकेतील ऑक्सिजनचा पुरवठा सदर महिलेस केला. यावेळी साई रत्न म्बुलन्सचे विलास गिते, निखील कासार, संजय निळे, आदित्य गोपाले, प्रवीण तातळे यांनी सदर महिलेला वाचविण्याचा खूप प्रयत्न केला.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन काही युवकांनी त्वरीत एका राजकीय पक्षाच्या पदाधिकार्‍यांच्या खाजगी सचिवाला फोन लावला. या प्रयत्नानंतर रात्री एक वाजता तिला शहरातील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. या रुग्णालयात सदर महिलेवर उपचार सुरू झाले मात्र काही क्षणातच तिचा मृत्यू झाला होता. केवळ ऑक्सिजन न मिळाल्याने सदर महिलेला आपला प्राण गमवावा लागला. तिच्यासाठी केलेले प्रयत्न अपयशी ठरले. यामुळे रुग्णवाहिका चालकांनी दुःख व्यक्त केले. संगमनेर शहरात ऑक्सिजन बेड अभावी रुग्णांच्या नातेवाईकांची मोठी गैरसोय होत आहे. या महिलेच्या निधनाने प्रशासनाने याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com