'ओव्हरलोडेड' वाळूच्या गाड्या अडवल्या; ग्रामस्थांचा रौद्रावतार!

'ओव्हरलोडेड' वाळूच्या गाड्या अडवल्या; ग्रामस्थांचा रौद्रावतार!

वैजापूर | वार्ताहर

बाभूळगाव गंगा (Babhulgoan Ganga) येथील वाळू पट्ट्यातून शासकीय नियमांचे उल्लंघन करून क्षमतेपेक्षा अधिक वाळू वाहतुक होत असल्याचा आरोप करीत बाभूळगावनंतर आता लाडगावकर ग्रामस्थांना रौद्रावतार अंगिकारावा लागला आहे.

बेकायदा वाळू वाहतुकीमुळे होणाऱ्या त्रासामुळे संतापलेल्या लाडगावकर ग्रामस्थांनी बुधवारी (दि. २७) रस्त्यावर उतरून तब्बल वीसहून अधिक गाड्या अडविल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे ही बाब कळल्यानंतर वीरगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली खरी, पण पोलिसांना पाहून काही गाडीचालकांनी रिव्हर्स गिअर तेथून पोबारा केल्याचे सूत्रांकडून कळते. तर काही गाड्या पोलिसांनी पोलिस ठाण्यात जमा केल्याचे सांगण्यात आले.

मागच्या आठवड्यात बाभुळगाव गंगा येथील गोदापात्रतून भरलेली ओव्हरलोडेड वाहने स्थानिक ग्रामस्थांनी अडवून व पडकून वीरगाव पोलिसांच्या हवाली केली होती. नंतर पोलिसांनी या वाहनांवर दंडात्मक कारवाईसाठी वैजापूर तहसीलदारांना पत्रही लिहिले होते. त्याबाबत पुढे काय झाले याबाबत अजून उलगडा झाला नाही. मात्र, यानंतर या प्रकाराला आळा बसेल, अशी अपेक्षा स्थानिक लोकांकडून व्यक्त केली जात होती. मात्र, आता अगदी तसाच प्रकार पुन्हा वीरगाव पोलिस ठाण्याच्याच हद्दीत बुधवारी रात्री घडल्याचे सूत्रांकडून समजते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बाभुळगाव येथील गोदापात्रातून वाळू उपसा केल्यानंतर काही वाहने वेळेची मर्यादा उलटून गेल्यानंतर क्षमतेपेक्षा अधिक वाळू भरून वाहतुकीच्या तयारीत असल्याची माहिती लाडगाव येथील ग्रामस्थांना मिळाली होती. त्यानंतर ग्रामस्थांच्या पथकाने बुधवारी रात्री उशिरा रस्त्यावर उतरून वाळू वाहतूक करणारी अनेक (अंदाजे २० ते २५) वाहने रस्त्यावर अडवून धरली. यावेळी वाळू वाहतूकदार आणि ग्रामस्थ यांच्यात वादावादी पण झाल्याचे कळते. तरीही ग्रामस्थ गाड्या न सोडण्याबाबत ठाम राहिले. त्यानंतर वीरगाव पोलिसांनाही याबाबत कळवले. पोलिसांनी तातडीने त्या ठिकाणी धाव घेतली. यावेळी पोलिसांना पाहून बेकायदा पद्धतीने वाळू वाहतूक करणाऱ्या गाडीचालकांची तंतरली.

यानंतर पोलिसांच्या पथकाने संबंधित गाडीचालकांना गाड्या वजनकाट्यावर घेण्यास भाग पडले. तेथे वजन केल्यावर अनेक गाड्यांकडे तीन ब्रास वाळू भरण्याची पावती होती. पण प्रत्यक्षात गाड्यांमध्ये पाच ब्रास वाळू भरली असल्याचे आढळले. यामुळे पोलिसांचा संताप झाला. हे पाहून काही गाडीचालकांनी रिव्हर्स गिअर टाकत धूम ठोकली. तर चार ते पाच गाड्या पोलिसांनी जप्त करून पोलिस ठाण्याकडे नेल्याची चर्चा तेथे सुरु होती, असे सूत्रांनी सांगितले.

बाभुळगाव गंगा येथील वाळू उपसा आणि वाहतूक सध्या या परिसरातील 'हॉट' आणि चर्चेचा विषय बनला आहे. त्यातच येथे वाळू उपसा व वाहतुकीबाबत शासकीय नियमांचे उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी स्थानिक ग्रामस्थ करीत असून, त्याकडे शासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष होत असल्याचाही आरोप केला जात आहे. वाळू वाहतुकीसाठी वाहनधारक रात्रीचा अंधार आणि छुपे रस्ते याचा आधार घेत असल्याची ओरड स्थानिक ग्रामस्थ करीत असून, त्यामुळेच या ग्रामस्थांकडून वाळू वाहतुकीच्या गाड्या अडविण्याचे प्रकार घडत असल्याचे पाहायला मिळत आहे, असे सूत्रांनी सांगितले.

Related Stories

No stories found.