सोयाबीनचे दर कमी झाल्यामुळे शेतकरी वर्गात तीव्र नाराजी

सोयाबीनचे दर कमी झाल्यामुळे शेतकरी वर्गात तीव्र नाराजी

पुणतांबा (वार्ताहर)

सोयाबीनचे दर ११ हजार रुपये क्विंटलवरून थेट ५५०० रुपये प्रति क्विंटल झाल्यामुळे पुणतांबा परिसरातील शेतकरी वर्गामध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.

केंद्र सरकारने सोयाबीनसह काही तेलबियावरचे आयात शुल्क कमी केल्यामुळे भाव एकदम कमी झाले आहेत. आठ दिवसांत भावामध्ये एवढी घसरण झाल्यामुळे शेतकरी वर्गाला धक्काच बसला आहे. परिसरात अंदाजे दोन हजार एकर क्षेत्रात सोयाबीनचे पीक असून वेळेवर पाऊस पडल्यामुळे पीक सुद्धा जोमात आहे.

१० दिवसापूर्वी असलेले भाव विचारात घेता शेतकरी वर्ग खुशीत होता. मात्र भाव घसरल्यामुळे त्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. कारण सोयाबीन सोंगणी तसेच मळणी यंत्रातून काढणीचे दर आणखी वाढले आहे. तसेच मजूर सुद्धा वेळेवर मिळत नाही. त्यामुळे शेतकरी वर्गाची मोठ्या प्रमाणात कोंडी झाली आहे. सोयाबीनचे दर ११ हजार रुपयांवरून ५५०० रुपयापर्यंत कमी झाले आहेत. मग तेलाचा डबा २४०० रुपयांवरून १००० रुपये होणार का? असा सवाल शेतकरी वर्गाने कालपासून समाज माध्यमावर विचारला आहे. हे सर्व संदेश सर्व माध्यमांवर फिरत होते.

शेतकऱ्यांचा शेतीमाल काढणीला आला की लगेच भाव जाणूनबुजून पाडले जातात. परिणामी शेतकऱ्यांना भावच मिळत नाही. शेतकऱ्यांकडील माल संपला पुन्हा भाववाढ होते, अशी धारणा शेतकरी वर्गात झाली असून त्यात बऱ्याच अंशी तथ्य असल्याचे या घटनेवरून दिसून येते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com