कर्जत तालुक्यात भाजपचे आऊटगोईंग सुरूच

प्रा. राम शिंदे, खा. डॉ. विखे पाटलांसमोर आव्हान
कर्जत तालुक्यात भाजपचे आऊटगोईंग सुरूच

कर्जत (किरण जगताप)

कर्जत-जामखेड मतदारसंघात आ. रोहित पवार यांनी एन्ट्री केल्यापासून राजकीय गणिते बदलू लागली आहेत. मागील आठवडाभरात राजकीय क्षेत्रात मोठ्या घडामोडी घडल्या. भाजपमधून आऊटगोंईंग सुरूच असून हे रोखण्याचे मोठे आव्हान माजी मंत्री प्रा. राम शिंदे व खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्यासमोर आहे.

कर्जत ताालुक्यात आ. पवार निवडुन आल्यानंतर राजकीय घडामोडी सातत्याने सुरू आहेत. सत्तेचा परिणाम म्हणून राष्ट्रवादीत इन्कमिंग वाढले. सध्याच्या इन्कमिंगचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. कोणी याला आ. रोहित पवारांचा झंझावात तर कोणी भाजपातील नेत्यांची मजबुरी असे म्हणत आहेत. कर्जतमधील सध्याच्या राजकीय परिस्थितीचा अर्थ कसाही काढला तरी भाजपा बॅकफुटला गेलेली आहे. भाजपातून राष्ट्रवादीत होणारे प्रवेश रोखण्याचे मोठे आव्हान पक्षासमोर आहे.

प्रा. राम शिंदे यांनी आपल्या पराभवानंतर विखेंवर निशाणा साधला होता. मात्र आता भाजपातून आऊटगोइंग सुरू असल्याने भाजपा अडचणीत आहे. त्यावर मात करण्यासाठी खासदार विखे पाटील आणि प्रा. शिंदे यांचे एकत्रित प्रयत्न सुरू आहेत. त्यांची सक्रियता सूचक आहे. प्रा. शिंदे हे गेल्या आठ- दहा दिवसांपासून अतिशय सक्रिय झालेले दिसत आहेत. कर्जतमधील विकासकामांची उद्घाटने, नेत्यांच्या बैठकी घेऊन त्यांचे मनोबल उंचावण्याचे काम करत आहेत. पक्ष सोडून जाणार्‍यांबाबत ते कठोर भूमिका मांडत आहेत. स्वार्थासाठी पक्ष सोडणार्‍यांवर त्यांचे प्रहार सुरूच आहेत.

पक्षाच्या पदाचा राजीनामा देवून पक्षात अस्वस्थता निर्माण करणार्‍यांनाही त्यांनी जाहीर सभेतून खडे बोल सुनावले आहेत. खा. सुजय विखे पाटील हे मात्र कर्जतमध्ये भाजपातून होत असलेल्या आउटगोइंगकडे सकारात्मकतेने पाहत आहेत. पक्षाला यातून नवी पालवी फुटणार असल्याचा त्यांना आशावाद आहे. नवीन कार्यकर्त्यांना येथून संधी मिळणार असल्याचे ते सूचित करत आहेत. पक्ष सोडून जाणारे हे प्रपंचासाठी जात आहेत. कोणाचे जेसीबी तर कोणाचे कोणाचे वाईन शॉप बंद पाडल्याने हे लोक पक्ष सोडून जात असल्याचे त्यांनी सूचित केले. त्यातून कर्जतमधील एक बडा नेता राष्ट्रवादीत जाणार असल्याची चर्चा रंगत आहे. त्या नेत्याचा प्रवेश रोखण्यात त्यांना यश येते का ? हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com