करोनाच्या उच्चाटनासाठी व जनतेच्या कल्याणासाठी विष्णुयाग महायज्ञाचे आयोजन

जगदंब सेवा परिवाराचा अध्यात्मिक उपक्रम
करोनाच्या उच्चाटनासाठी व जनतेच्या कल्याणासाठी विष्णुयाग महायज्ञाचे आयोजन

अहमदनगर | प्रतिनिधी | Ahmednagar

अहमदनगर पुरोहित वर्ग व जगदंब सेवा परिवाराच्या वतीने अधिक मासानिमित्त सर्व जनतेच्या कल्याणासाठी व आलेल्या करोना महामारीच्या उच्चाटनासाठी श्री विष्णुयाग महायज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे १६० वर्षांनी अश्विन महिन्यात अधिक मास आलेला आहे. या महापर्वकालात विष्णू पूजेला अनन्यसाधारण महत्व आहे. त्यामुळे या अधिक मासात समाजाच्या कल्याणासाठी, सर्वांना लक्ष्मी प्राप्ती होण्यासाठी तसेच चालू असलेला कोरोना महामारीचा संसर्ग कमी व्हावा आणि सर्व जनतेला उत्तम आरोग्याची प्राप्ती व्हावी यासाठी कोर्टगल्ली मधील सुयोग मंगल कार्यालयात श्री विष्णुयाग महायज्ञाचे आयोजन करण्यात आले होते.

श्री विष्णुयाग महायज्ञात सोशल डिस्टनसिंगचे नियम पाळून ५ प्रमुख यजमान पूजेसाठी प्रत्यक्ष सामील झाले होते तर विविध ठिकाणच्या ८0 यजमानांनी ऑनलाइन सहभाग घेतला होता. यावेळी विष्णू पूजन, तुळसी अर्चन, यज्ञ स्वाहाकार करण्यात आला. अपूप दान, प्रसाद, पूर्णाहुती इत्यादींनी यज्ञाची सांगता झाली.

श्री विष्णुयाग महायज्ञाचे जगदंब सेवा परिवाराचे पदाधिकारी अक्षय चिंधाडे, नरेंद्र खिस्ती, ऋषिकेश कुलकर्णी, प्रसाद पांडव, ऋषिकेश चिंधाडे, देवेंद्र तिवारी, उपेंद्र खिस्ती, मयुर जोशी यांनी पौरोहित्य केले. दौंड येथील वैभव कांबळे महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत यज्ञाची पूर्णाहुती झाली. यावेळी वे.शा.सं. घनपाठी महेशशास्त्री रेखे, वे.शा.सं. घनपाठी सागरशास्त्री कुलकर्णी, रा.स्व.संघाचे प्रांत संघचालक नाना जाधव आदि सहभगी झाले होते. या यागासाठी सुयोग मंगल कार्यालय पुंडलिक परीवाराने मोफत उपलब्ध करून विशेष सहकार्य केले.

वैभव कांबळे महाराज यांनी जगदंब सेवा परिवाराने राबवलेल्या या अध्यात्मिक उपक्रमाचे कौतुक करून समाज कल्याणासाठी कायम असे स्तुत्य उपक्रम घडत राहो यासाठी शुभेच्छा दिल्या .

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com