फळबाग लागवडीसाठी मिळणार सुधारित अनुदान

सिंचनाची अट वगळली || कृषी विभागाचा निर्णय
फळबाग लागवडीसाठी मिळणार सुधारित अनुदान

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शासन अनुदानातून होणार्‍या फळबाग लागवड योजनेतील अनुदान वाढवून मिळण्याची मागणी शेवटी फळाला आली. अनेक वर्षांपासून प्रतिक्षेत असलेल्या फळबाग लागवड योजनेतील अनुदान वितरणाच्या मापदंडांमध्ये अखेर राज्य शासनाने सुधारणा केली आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाला विविध 16 फळपिकांसाठी सुधारित वाढीव अनुदान देण्याचा मार्ग शासन निर्णयाने मोकळा झाला आहे. यामुळे शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच फळबाग योजनेसाठी असणार्‍या ठिबकच्या योजनेला यंदापासून कात्री लागणार आहे.

फळबाग लागवडीसाठी सुधारित मापदंडबाबत कृषी विभागाच्यावतीने माहिती देण्यात आली. त्यानूसार राज्यात भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेच्या सुधारित मापदंडांना मंजुरी मिळाल्यामुळे शेतकर्‍यांना वाढीव अनुदान मिळणार आहे. तसेच आता खते देण्याची बाब अनुदानात समाविष्ट झाली आहे. योजनेच्या आधीच्या नियमांमध्ये केवळ ठिबक सिंचनाद्वारे पाणी देणे, अशी ही बाब होती. आता मात्र रासायनिक व सेंद्रिय खते देणे, ही नवी बाब आणली गेली आहे. त्यामुळे या दोन्ही बाबीसाठी शेतकर्‍यांना अनुदान देण्यात आता अडचण येणार नाही.

याचा संपूर्ण राज्यात व विविध प्रकारच्या सोळा फळबाग लागवड योजनेत शेतकर्‍यांना लाभ मिळून बळ मिळणार आहे. शेतकर्‍यांना आधीच्या योजनेतील जुन्या नियमानुसार जिवंत झाडांचे प्रमाण राखावे लागत होते. त्यानुसार तीन वर्षांमध्ये अनुक्रमे 50 टक्के, 30 टक्के व 20 टक्के अशा प्रमाणात अनुदान वाटले जात होते. ही पद्धत आता बंद करण्यात आली आहे. अंदाजपत्रकानुसार आता तीन वर्षामध्ये निश्चित रकमेनुसार अनुदान दिले जाईल. राज्यात सध्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून केवळ दोन हेक्टरपर्यंत अनुदान दिले जाते.

असे आहे फळपिकांना असे मिळणार अनुदान

आंबा कलमे- 67,005 रुपये. आंबा कलमे (सघन लागवड) - 1,29,306 रुपये, काजू कलमे- 67,027 रुपये, पेरू कलमे (सघन लागवड)- 2,27,517 रुपये, पेरू कलमे - 74860 रुपये, डाळिंब कलमे- 120777 रुपये, कागदी लिंबू कलमे 72,907 रुपये, संत्रा, मोसंबी कलमे- 82,879 रुपये, संत्रा कलमे- 121519 रुपये, सीताफळ कलमे- 88,275 रुपये, आवळा कलमे- 60064 रुपये, चिंच कलमे- 57,465 रुपये, जांभुळ कलमे 57,465 रुपये, कोकम कलमे- 57,589 रुपये, फणस कलमे- 54,940 रुपये, अंजीर कलमे- 1,13,936 रुपये, चिकू कलमे- 64,455 रुपये, नारळ रोपे बाणावली (पिशवीसह)- 93,817 रुपये, नारळ रोपे बाणावली (पिशवीविरहित)- 75,817 रुपये, नारळ रोपे टीडी (पिशवीसह)- 93,817 रुपये, नारळ रोपे टीडी (पिशवी विरहित)- 79,417 रुपये असे आहेत.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com