मुक्त विद्यापीठामुळे माध्यमिक शिक्षकांची ‘परीक्षा’ कठीण

शाळा सुरू झाल्यामुळे परीक्षा देणे अडचणीचे
मुक्त विद्यापीठामुळे माध्यमिक शिक्षकांची ‘परीक्षा’ कठीण

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

माध्यमिक शिक्षकांसाठी असलेल्या शालेय व्यवस्थापन पदविका शिक्षणक्रम (डीसीएम) या कोर्ससाठी दरवर्षी उन्हाळ्याच्या सुटीमध्ये परीक्षा घेतल्या जातात. मात्र, यंदा नाशिक येथील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापाठाने 24 ते 30 जून या कालावधीत घेण्यासाठी वेळापत्रक जाहीर केले आहे. आताच 13 जूनला शाळा सुरू झाल्या आहेत. शाळा सुरू असतांना आठ दिवसांची सुटी घेऊन परीक्षा देणे शिक्षकांसमोर अडचणीचे ठरले आहे.

तसेच वेतन व निवड श्रेणी प्रशिक्षण आणि पंचायत राज समितीच्या शाळांना भेटीही याच कालावधीत असणार आहेत. त्यामुळे या परीक्षेचे वेळापत्रक बदलावे किंवा ही परीक्षा ऑनलाईन घ्यावी, अशी मागणी शिक्षकांनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत आणि मुक्त विद्यापीठाकडे मेलद्वारे केली आहे.

नगरमधील शिक्षकांनी याबाबत शेकडो मेल विद्यापीठाकडे तसेच उच्च शिक्षण विभागाला पाठवले आहेत. राज्यातील माध्यमिक शाळा प्रमुखांच्या सेवांतर्गत प्रशिक्षणाची गरज भागविण्याच्या दृष्टीने हा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. मुख्याध्यापक होणार असलेल्या शिक्षकांसाठी हा कोर्स आता अनिवार्य करण्यात आलेला आहे. या अभ्यासक्रमाच्या परीक्षा मे म्हणजे सुटीच्या कालावधीत असतात. यंदा मात्र या परीक्षा शाळा सुरू झाल्यानंतर जूनमध्ये घेतल्या जात आहेत.

नाशिक येथील मुक्त विद्यापीठाने 24 ते 30 जून या कालावधीत परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. हे वेळापत्रक पाहता परीक्षा देणे शिक्षकांना कठीण जाणार आहे. सदरचा कोर्स हा सुटीच्या कालावधीतील असून परीक्षाही सुटीतच घेतल्या जातात. त्यात शिक्षकांचे वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षणदेखील चालू आहे. नवीन शैक्षणिक वर्षात रजा मिळणे कठीण आहे. अशा परिस्थितीत एक तर परीक्षा रद्द करावी किंवा परीक्षा ऑनलाईन घ्यावी, अशी मागणी शिक्षकांनी केली आहे. तसेच जूनच्या शेवटच्या आठवड्यात पंचायत राज समिती शाळांना भेटी देणार आहे. त्यामुळे शिक्षकांना परीक्षेसाठी सुटी मिळणार नाही.

वर्षाच्या सुरुवातीला एवढ्या सलग रजा मिळणे कठीण आहे. प्रत्येकाचा एखादा-दुसरा पेपर नक्की बुडणार आहे. विद्यापीठाकडून परीक्षेच्या वेळापत्रकात बदल होणार नसेल किंवा परीक्षा ऑनलाईन घेतली जात नसेल तर परीक्षेपासून अनेक माध्यमिक शिक्षक वंचित राहतील.

- माध्यमिक शिक्षक, अहमदनगर

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com