साई दर्शनासाठी दिवसाला पंधरा हजार दर्शन पास

साई दर्शनासाठी दिवसाला पंधरा हजार दर्शन पास

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

सर्वधर्म समभवाचे प्रतीक असलेल्या शिर्डीतील जगविख्यात साईबाबांचे मंदिर उघडण्यासाठी काऊंटडाऊन सुरू झाले असून केवळ 24 तास शिल्लक राहिले आहेत, त्या पार्श्वभूमीवर श्री साई संस्थानच्यावतीने साई दर्शनासाठी दिवसाला पंधरा हजार दर्शन पासची व्यवस्था भाविकांसाठी ठेवण्यात आल्याची माहिती श्री साई संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिली.

कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्यातील धार्मिक तीर्थक्षेत्रे सात महिन्यांपासून बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे शिर्डी शहरातील आंतरराष्ट्रीय देवस्थान असलेल्या साईबाबांच्या मंदिराच्या इतिहासात प्रथमच साई मंदिर बंद करण्यात आले होते. गेल्या 19 ते 20 महिन्यांच्या कालावधीत साई मंदिर दोन वेळा बंद झाले. यामध्ये शहरातील अनेक छोट्या मोठ्या लोकांना आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे आता मंदिर उघडण्यासाठी फक्त 24 तास शिल्लक राहिले असतांना साईमंदीर खुले होण्याकडे शिर्डी ग्रामस्थांची आस लागून राहिली आहे. तिसर्‍या लाटेचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकार यशस्वी ठरले असून घटस्थापनेच्या मुहूर्तावर दि. 7 ऑक्टोबर रोजी राज्यातील सर्व धार्मिक तीर्थस्थळे मंदिरे खुले करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय सरकारने घेतला आहे.

शिर्डी तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी सरकारच्या निर्णयाचे जल्लोषात स्वागत केले. शिर्डीकरांना आनंद झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने एका दिवसाला 15 हजार पासेससची व्यवस्था भाविकांसाठी करण्यात आली असून त्यामध्ये 5 हजार फ्री ऑनलाईन पद्धतीने, 5 हजार ऑफलाइन पद्धतीने (बायोमेट्रिक) तर पाच हजार पासेस सशुल्क पद्धतीने असे नियोजन करून दोन भाविकांमध्ये अंतर सहा फुटावर असे मार्किंग करण्यात आले आहे. तसेच थर्मल स्क्रीनिंग, सॅनिटायझरची व्यवस्था मोठ्या प्रमाणात केली आहे. मंदिरात मूर्तीच्या गाभार्‍यात हात न लावता मूर्ती दर्शन घ्यावयाचे असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी श्री. ठाकरे यांनी दिली आहे.

असे असले तरी शासनाच्यावतीने कोविड लसीकरणाचे दोन डोस घेतलेल्या व्यक्तींनाच प्रवेश असा आदेश सरकारने पारीत केला नसल्याने मंदिर प्रशासनासमोर अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळे कोविडच्या प्रादुर्भाव वाढू नये यासाठी दोन डोस लसीकरण पुर्ण करण्यासाठी शिर्डी नगरपंचायतच्या माध्यमातून माजीमंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकाराने लसीकरण सप्ताह मोहीम राबविण्यात आली आहे. शहरात जवळपास लसीकरण पूर्ण होत आहे. शिर्डी शहरातील व्यवसायिकांनी देखील लसीकरण करून घेतले असून शासनाच्या नियमावलीनुसार अटीशर्तीचे पालन करण्यासाठी सज्ज झाले आहे. प्रत्येकाने मास्क, सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझरचा वापर करावा, असे आवाहन नगरपंचायतचे नगराध्यक्ष तथा साईसंस्थानचे विश्वस्त शिवाजी गोंदकर यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.