राहाता परिसरात अवघ्या तीन टक्के खरिपाच्या पेरण्या

पावसाने दडी मारल्याने शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत
राहाता परिसरात अवघ्या तीन टक्के खरिपाच्या पेरण्या
संग्रहित

राहाता (वार्ताहर) - पावसाने दडी मारल्याने खरिपाचे पीक वाया जाणार या भीतीमुळे शेतकर्‍यांपुढे मोठे संकट उभे राहिले आहे. जून महिना संपण्यासाठी काही दिवसच बाकी आहे. तरीही खरीप पेरणीइतका पाऊस झाला नसल्यामुळे खरिपाचे पीक हातातून जाते की काय हा प्रश्‍न बळीराजाला सतावत आहे.

यावर्षी चांगला पाऊस पडेल व खरिपाची पिके जोमात येऊन गेल्या दोन वर्षापासून करोनामुळे शेती पिकाचे झालेले आर्थिक नुकसान या पिकातून येणार्‍या उत्पन्नातून काही प्रमाणात दूर होण्यास मदत होईल. या अपेक्षेने शेतकर्‍यांनी शेती मशागत, बियाणे, रासायनिक खत खरेदी करण्यासाठी लगबग सुरू केली होती. परंतु पावसाचे प्रमाण अत्यंत कमी असल्याने वेळेवर पेरणी होत नाही म्हणून पुन्हा डोक्यावर कर्जाचा बोजा वाढेल ही भीती शेतकर्‍यांना वाटू लागली आहे. मागील दोन वर्षांपासून करोना या आजारामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन परिस्थिती निर्माण झाली असल्यामुळे शेतकर्‍यांना शेतीमालाची विक्री करण्यासाठी बाजारपेठ उपलब्ध नव्हती. परिणामी अनेक शेतकर्‍यांना कवडीमोल भावात शेतीमालाची विक्री करावी लागली.

करोनामुळे अचानक निर्माण झालेल्या परिस्थितीने शेतकरी आर्थिक संकटात सापडला. शेतीला पूरक समजला जाणारा दूध व्यवसाय लॉकडाउनमुळे अडचणीत आला. संपूर्ण देशात हॉटेल व्यवसायाबरोबरच इतर व्यवसाय बंद असल्याने दुधाला मागणी कमी झाली. 32 रुपये लिटरप्रमाणे विक्री होत असलेले दूध 22 रुपये लिटरप्रमाणे शेतकर्‍यांना विकावे लागले. त्यामुळे शेतीमालाबरोबरच दूध व्यवसाय अडचणीत सापडल्यामुळे शेतकर्‍यांची आर्थिक गणिते पूर्णतः बिघडली. यावर्षी मृग नक्षत्रात चांगला पाऊस होईल व खरिपाची पेरणी वेळेत होऊन सोयाबीन मका व फळ बागेपासून चांगले उत्पन्न मिळून करोनामुळे शेतीमालाची झालेली आर्थिक हानी कमी होण्यास मदत होईल ही अपेक्षा बळीराजाला होती.

परंतु मृग नक्षत्र संपून 21 जूनपासून सूर्याचा आर्द्रा नक्षत्र प्रवेश झाला तरी वरुणराजाची कृपा होत नसल्यामुळे शेतकर्‍यांची चिंता वाढली. मागील वर्षी 22 जून अखेर राहाता परिसरात 50 टक्के खरिपाच्या पेरण्या झाल्या होत्या, परंतु यावर्षी 21 जूनपर्यंत अवघ्या 3 टक्के पेरण्या झाल्या आहेत. खरिपाची पेरणी 75 ते 100 मिमी पाऊस झाल्यावरच करावी, असे कृषी अधिकारी बापूसाहेब शिंदे यांनी सांगितले आहे.

परिसरातील शेती सिंचनासाठी दारणा, गंगापूर धरणातून पाण्याचे आवर्तन मिळते परंतु धरण क्षेत्रातही पावसाचे प्रमाण अत्यंत कमी असल्याने धरणात पाणी साठा पुरेसा नसून, वेळेत पाऊस झाला नाही तर नागरिकांना पिण्यासाठी पाणी आरक्षण होऊ शकते. बळीराजाला आर्थिक संकटातून सावरण्यासाठी वरुणराजाचे वेळेवर आगमन होणे गरजेचे आहे तरच खरिपाच्या पेरण्या वेळेवर होऊन शेतकर्‍यांच्या चेहर्‍यावर आनंद दिसेल.

राहाता जलसंपदा विभागाच्या आकडेवारीनुसार यावर्षी 22 जून अखेर राहाता-25 मिमी, शिर्डी-22 मिमी, चितळी-25 मिमी, रांजणगाव-34 मिमी अशी पावसाची नोंद झाली आहे तर मागील वर्षी 22 जून अखेर राहाता-167 मिमी, शिर्डी-123 मिमी, चितळी-140 मिमी, रांजणगाव- 173 मिमी याप्रमाणे पावसाची नोंद झाली होती.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com