
अहमदनगर । प्रतिनिधी
राज्यात यंदा मान्सून (Mansoon) दहा दिवस आधी धडकणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने (IMD) वर्तविला आहे. पावसाला लवकर सुरूवात झाल्यास शेतकऱ्यांची (Farmers) खते आणि बियाण्यासाठी (Fertilizers and seeds) धावधाव होणार आहे.
दुसरीकडे कृषी विभागाने (Department of Agriculture) बियाण्याचे नियोजन करताना खरीप हंगामासाठी ७० हजार २१ क्विंटल बियाण्याची मागणी केली होती. प्रत्यक्षात आतापर्यंत ९ हजार ९१४ क्विंटल बियाणे उपलब्ध झाले आहे. यामुळे खरीप हंगामात शेतकऱ्यांची बियाणासाठी चांगलीच धाव होणार असल्याचे चित्र आहे.
नगर जिल्ह्यात खरिपाचे ४ लाख ४७ हजार सरासरी क्षेत्र आहे. मात्र, अलिकडच्या काही वर्षात खरीप हंगामाचे क्षेत्र वाढताना दिसत आहे. मागील वर्षी देखील ५ लाख ३१ हजारांहून अधिक क्षेत्रावर खरीप हंगामाच्या पिकांची पेरणी झाली होती.
यंदा देखील चांगला पाऊस वर्तविण्यात आल्याने कृषी विभागाने येत्या खरीपासाठी ६ लाख ५० हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले आहे. हंगामासाठी ३४ हजार ३९७ क्विंटल सार्वजनिक तर ३५ हजार ६२३ क्विंटल बियाणे खासगी कंपन्यामार्फत जिल्ह्यात उपलब्ध करण्यात येणार आहे. यात एकटा महाबिज कंपनी २६ हजार ७९० क्विंटल बियाणे उपलब्ध करून देणार आहे.
दरम्यान, हवामान खात्याने यंदा दहा दिवस आधीच मान्सूनचे आगमन होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तसेच झाल्यास कृषी विभागाचे बियाण्याचे उपलब्ध करण्याचे नियोजन कोलमडण्याची शक्यता आहे. मागणी ७० हजार क्विंटलची असतांना प्रत्यक्षात १० क्विंटल बियाणे उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांची ऐनवेळी तारांबळ होण्याची शक्यता आहे. कृषी विभागाच्या म्हणण्यानूसार बियाणे कंपन्यांकडून पुरवठा सुरू असून पुढील आठवड्यात त्यात आणखी वाढ होणार आहे. शेतकऱ्यांची कोणत्याही प्रकारे अडचण होणार याची दक्षता घेण्यात येणार आहे.
मागणी आणि पुरवठा
भात ३ हजार ४२० (२ हजार १२९), बाजरी ३ हजार ७४५ (७०), मका १० हजार ६५० (३७०), तूर २ हजार ७२८ (शून्य), मुग १ हजार ७१० (१५०), उडीद ८ हजार ६१० (६०२), भूईमुग ५ हजार (शून्य), तीळ ४ (शून्य), सुर्यफुल २१ (शून्य), सोयाबीन ३२ हजार २५ (६ हजार ४००), कापूस २ हजार १०० (१८६) (आकडे क्विंटलमध्ये)
यंदा सोयाबीन वाढणार?
जिल्ह्यात काही वर्षांत सोयाबीनचे क्षेत्र वाढणार आहे. सध्या देशात खाद्य तेलाची टंचाई निर्माण झाली असून यासाठी सोयाबीन पीक घेतल्यास त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. सोयाबीनला चांगला भाव मिळाल्यास त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. यामुळेच कृषी विभागाने यंदा सोयबीनचे वाढीव क्षेत्र प्रस्तावित केलेले आहे.