
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
ऑनलाईनच्या कामावर बहिष्काराची हाक देऊन, राज्य आरोग्य विभाग आशा व गट प्रवर्तक संघटना आणि नगर जिल्हा आशा संघटनेच्यावतीने जिल्हा परिषदेसमोर सोमवारी (दि.4 ) निदर्शने करण्यात आली. कोणतेही परिपत्रक नसताना, आशा वर्करकडून फुकटात ऑनलाईनची करून घेतली जाणारी कामे त्वरीत बंद करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
या आंदोलनात संघटनेचे राज्य उपाध्यक्ष कॉ. अॅड. सुधीर टोकेकर, जिल्हा संघटक कॉ. सुरेश पानसरे, आशा वर्कर संघटनेच्या जिल्हा अध्यक्षा सुवर्णा थोरात, अर्चना आगरकर, भारती सूर्यवंशी, मीनाक्षी वारे, वर्षा घोंगडे, स्वाती पाठक, मीना म्हस्के, मंदा पाठक, आशा जाधव, अलका गोरे, मनीषा शिंदे, शोभा गायकवाड, सारिका डेंगळे, अनिता डहाळे, अश्विनी लोंढे, असिफा शेख, ललिता नरुण, मनिशा सरोदे, शकीला शेख, कविता लाहोर आदींसह आशा व गट प्रवर्तक महिला कर्मचारी सहभागी झाल्या होत्या. आशा कर्मचारी यांची फिल्ड वर्कर म्हणून नेमणूक केलेली असतानाही त्यांना ऑनलाईनची कामे सांगितली जात आहेत. महाराष्ट्रभर आशा वर्कर कडून ऑनलाईनची कामे करून घेतली जात आहेत.
वास्तविक आशा वर्करचे काम फिल्ड वर्क असतानाही करोना काळापासून अनेक कामांचा बोजा राज्य सरकारने त्यांच्यावर टाकून कमी पैशात अनेक योजना राबवून घेतल्या आहेत. कोणतेही तांत्रिक शिक्षण नसताना आशा कर्मचार्यांकडून ऑनलाईनची कामे करण्याचा सापटा लावण्यात आहे. दरम्यान आशा संघटनांच्या कृती समितीने 15 दिवसांपूर्वी राज्य सरकारला यासंदर्भात निवेदन दिलेले आहे. कोणत्याही प्रकारे अँड्रॉइड मोबाईलचे प्रशिक्षण न देता तसेच आशा वर्करकडे अँड्रॉइड फोन नसताना त्यांच्याकडून ऑनलाईन कामे करून घेतली जात आहे. अशा वर्कर यांना ते काम जमत नाही, तरी त्यांच्यावर दबाव टाकण्यात येत आहे. वेगवेगळे मेडिकल ऑफिसर आणि संबंधित आरोग्य कर्मचारी आशा वर्कर यांच्यावर दबाव वाढवल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. ऑनलाईन कामावर बहिष्काराचे निवेदन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांना देण्यात आले.