वरिष्ठ व निवडश्रेणी ऑनलाईन प्रशिक्षणाचा खेळखंडोबा थांबवावा

दोषी अधिकार्‍यांना निलंबित करण्याची शिक्षक परिषदेची मागणी
वरिष्ठ व निवडश्रेणी ऑनलाईन प्रशिक्षणाचा खेळखंडोबा थांबवावा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

वरिष्ठ व निवडश्रेणी ऑनलाईन प्रशिक्षणाचा सुरू असलेला खेळखंडोबा थांबवून, प्रशिक्षणाचा पोरखेळ करणार्‍या अधिकार्‍यांना निलंबित करावे व प्रशिक्षणात निर्माण झालेल्या त्रुटी दूर करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली असल्याची माहिती बाबासाहेब बोडखे यांनी दिली.

या मागणीचे निवेदन शिक्षक आमदार तथा शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष नागो गाणार, शिक्षक परिषद मुंबई विभागाचे अध्यक्ष उल्हास वडोदकर, कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी शालेय शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड, शिक्षण सचिव रणजितसिंह देओल, शिक्षण आयुक्त सुरज मांढरे व शिक्षण संचालकांना दिले आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने मागील अडीच वर्षांपासून सतत केलेल्या पाठपुराव्याने 1 जूनपासून वरिष्ठ व निवडश्रेणी ऑनलाइन प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे. प्रशिक्षण सुरू होऊन काही तासांतच प्रशिक्षण घेताना अनेक अडचणींना शिक्षकांना सामोरे जावे लागले आहे.

प्रशिक्षण राबवणारी यंत्रणाच सक्षम नसल्याने समस्या निर्माण झाले असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. प्रशिक्षण घेणारे हजारो शिक्षक तांत्रिक बाबींमुळे निर्माण झालेल्या अडचणीने वैतागले आहेत. आयडी न येणे, प्रशिक्षण पुढे न जाणे, इमेल आयडी दुरुस्ती सांगणे, संकेतस्थळ बंद, यासारख्या अनेक अडचणींना शिक्षकांना सामोरे जावे लागत आहे. एक वर्ष प्रशिक्षणाची तयारी करूनही प्रशिक्षणाचा फज्जा उडाला आहे. प्रशिक्षणात राज्यातील 94 हजार 541 शिक्षकांनी नोंदणी केली.

प्रत्येक शिक्षकाकडून दोन हजार रुपये दराने 18 कोटी 90 लाख 80 हजार रुपये प्रशिक्षण शुल्क नियमबाह्य रीतीने वसूल करण्यात आलेले आहे. शुल्क आकारणीला शिक्षक परिषदेने विरोध केला होता. शुल्क घेऊनही प्रशिक्षणाची योग्य व्यवस्था करण्यात आली नसल्याची खंत शिक्षक परिषदेच्या वतीने व्यक्त करण्यात आली असल्याचे बोडखे यांनी म्हंटले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com