ऑनलाईन नोंदणीवाल्यांनाच मिळणार करोना लस

आयुक्त शंकर गोरे: केंद्राबाहेर यादीही लागणार
ऑनलाईन नोंदणीवाल्यांनाच मिळणार करोना लस

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

करोना लसीसाठी आरोग्य केंद्राबाहेर होणारी गर्दी टाळण्यासाठी महापालिकेने आता नवा उपाय शोधला आहे. ज्यांची ऑनलाईन नोंदणी होईल आणि केंद्रबाहेर लावलेल्या यादीत नाव असेल त्यांनाच लस मिळणार आहे. तसा आदेश आयुक्त शंकर गोरे यांनी काढला आहे.

शासनाने 18 ते 44 वयोगटातील तरुणांसाठी करोनाची मोफत लस देण्यास सुरूवात केली आहे. लसीसाठी गर्दी होत असल्याने कोवीड नियमांचा फज्जा उडत आहे. त्यातच लस कमी आणि गर्दी त्यापेक्षा जास्त अशी परिस्थिती असल्याने केंद्राबाहेर गोंधळ उडत आहे. त्यावर आता आयुक्तांनी उपाय शोधला आहे.

लस घेणार्‍यांना अगोदर ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणी झालेल्यांच्या नावाची यादी महापालिकेच्या केडगाव, मुकुंदनगर, नागापूर, माळीवाडा आणि बुरूडगाव रोडवरील आरोग्य केंद्राबाहेर लावली जाणार आहे. त्या यादीत ज्याचे नाव असेल त्यालाच कोरोनाची लस दिली जाणार आहे. इतरांना लस मिळणार नाही.

त्यामुळे रांगेत उभे राहणार्‍यांची संख्याही कमी होईल. यादीत नाव नसलेल्यांनी आरोग्य केंद्राबाहेर विनाकारण गर्दी करू नये असे आवाहन महापालिका आयुक्त शंकर गोरे, महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com