ऑनलाईन शिक्षण
ऑनलाईन शिक्षण
सार्वमत

ऑनलाईन शिक्षणाची नवीन संकल्पना

Arvind Arkhade

पारनेर|तालुका प्रतिनिधी|Parner

जगभर धुमाकूळ घालणार्‍या करोना विषाणूमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी आपल्या स्वखर्चाने राष्ट्रपती पारितोषिक प्राप्त संदीप गुंड यांच्या मदतीने शिक्षण अ‍ॅप्लिकेशन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यासह राज्यात आमदार निलेश लंके यांच्या माध्यमातून आदर्श प्रकल्प ठरणार आहे.

करोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे 15 जूनपासून डिजिटल शाळा सुरू करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. विद्यार्थ्यांचा लर्निंग प्रोग्रेस व युजेस ट्रॅकिंग करण्याचा कोणताही कॉमन प्लॅटफॉर्म उपलब्ध नसल्याने सध्या शिक्षक फ्री सोर्स असलेला डिजिटल कंटेंट व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवीत आहेत. परंतु होम लर्निंगसाठी व्हॉट्सअ‍ॅप व इतर माध्यमांतून विद्यार्थ्यांना पुरविलेल्या डिजिटल रिसोर्सेसमधून विद्यार्थी खरंच शिकत आहेत का? हा प्रश्न मात्र अनुत्तरीत आहे.

ही गरज ओळखून होम लर्निंगसाठी पारनेर तालुक्याचे आ. निलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली तंत्रस्नेही शिक्षक संदीप गुंड यांच्या दीप फाउंडेशनने online शाळा नावाचा अँड्रॉइड डिजिटल फ्लॅटफॉर्म तयार केला आहे. सदर फ्लॅटफॉर्मच्या मदतीने शिक्षक आपला लेसन प्लॅन करून विध्यार्थ्यांच्या घरच्या स्मार्ट फोनवर ब्रॉडकास्ट करू शकेल.

तसेच विद्यार्थ्यांचा लर्निंग प्रोग्रेस व युजेस ट्रॅक करून विद्यार्थी शिकत असल्याचे अहवाल शिक्षकांना देता येतील. सदर उपक्रमांतर्गत स्मार्ट फोन असणार्‍या प्रत्येक विद्यार्थ्याला तसेच शिक्षकांना स्वतंत्र लॉगिन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी आ. लंके यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विभागामार्फत स्मार्ट फोन असणार्‍या विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करण्यात आले असून सर्वेक्षणानुसार तालुक्यात सात हजार 192 विद्यार्थ्यांच्या पालकांकडे अँड्रॉइड स्मार्ट फोन आहे.

online शाळा अँप्लिकेशनमध्ये व्हिडिओ स्ट्रीमिंग, ब्रॉडकास्टिंगची सुविधा देण्यात आली आहे. शिक्षकांना आपल्या लॉगिनवर लेसन प्लॅन करून ब्रॉडकास्ट केलेला लेसन किती विद्यार्थ्यांनी अटेंड केला याचा अहवाल देता येतो. डिजिटल लायब्ररीमध्ये शिक्षकांनी ब्रॉडकास्ट केलेल्या लेसन संदर्भात दिलेले विविध डिजिटल लर्निंग रिसोर्सेस विद्यार्थी लॉगिनला अ‍ॅक्सेस करता येतात.

असाईनमेंट, किजवर विद्यार्थ्यांनी दिलेल्या रिस्पॉन्सचे रिपोर्ट्स ऐझिन लॉगिनवर पाहता येतात. आ. लंके यांच्या मार्गदर्शनाखाली करोनाच्या पार्श्वभूमिवर ऑनलाईन शिक्षणासाठी पारनेर तालुक्यात सुरू झालेला उपक्रम निश्चितच राज्याच्या शिक्षण विभागासाठी मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरणार आहे.

शिक्षण विभागाच्या सहकार्याने सदर उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी online शाळा या अ‍ॅप्लिकेशनच्या प्रत्यक्ष वापराबाबत प्रत्येक केंद्रातील दोन तंत्रस्नेही शिक्षकांना व सर्व केंद्रप्रमुख यांना नुकतेच प्रात्यक्षिक प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षण घेतलेले सदर तंत्रस्नेही शिक्षक आपल्या केंद्रातील सर्व शिक्षकांना सदर अ‍ॅप्लिकेशनच्या प्रत्यक्ष वापरासंदर्भात प्रशिक्षण देणार असून शाळा पातळीवर ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडे स्मार्टफोन आहे. त्या विद्यार्थ्यांच्या पालकांच्या स्मार्टफोनमध्ये सदर अ‍ॅप्लिकेशन इन्स्टॉल करून त्याचा प्रत्यक्ष वापर याविषयी माहिती देण्यात येणार आहे.

- संदीप गुंड, संस्थापक अध्यक्ष दीप फाउंडेशन

Deshdoot
www.deshdoot.com