
राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri
राहुरी येथे दोन दिवसांपूर्वी भरपेठेतून निवृत्त मुख्याध्यापकाची बँकेतून काढलेली दोन लाखांची रोकड अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना ताजी असतानाच काल दुपारच्या सुमारास राहुरी खुर्द येथून अॅक्सीस बँकेतून कांदा व्यापार्याची 2 लाख 40 हजारांची रोकड अज्ञात चोरट्यांनी लुटून नेली. ही घटना भरदिवसा दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास मुळा नदीपुलावर घडली.
या प्रकारामुळे आता राहुरी शहरातील व्यापारी भयभीत झाले असून पोलिसांच्या निष्क्रियतेमुळेच राहुरी शहरासह तालुक्यात चोरीच्या आणि लुटमारीच्या घटना घडत असल्याने पोलीस निरीक्षकांची बदली करून कार्यक्षम अधिकार्यांच्या नियुक्तीची मागणी व्यापार्यांनी केली आहे.
काल राहुरी येथील कांदा व्यापार्याची रक्कम बँकेतून काढून आणण्यासाठी तेथील दिवाणजी वैभव लक्ष्मण तनपुरे रा . वाघाचा आखाडा हे व चेतन अनिल भिगारकर रा. राहुरी ता. राहुरी यांच्या राहुरी मार्केट येथील कांदा आडतीवर अनिकेत रमेश गुंजाळ रा . गुंजाळ नाका ता . राहुरी हे देखील दिवाणजीचे काम करतात. काल दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास तनपुरे व गुंजाळ 2 लाख 40 हजाराची रोख रक्कम दुचाकीवर घेऊन कापडी पिशवीत ठेवून पिशवी मोटरसायकलचे हँडलला अडकवली व अॅक्सिस बँक येथून नगर-मनमाड हायवे रोडने राहुरी मार्केट यार्ड येथे येण्यासाठी निघाले.
त्यावेळी बँकेपासून थोडे पुढे आल्यानंतर राहुरी खुर्द येथील मुळा नदी पात्रावरील पुलावर आले असता पाठीमागून एक काळ्या रंगाचे मोटरसायकलवर दोन अनोळखी इसम आले. त्यांनी डोक्यात हेल्मेट घातलेले होते. त्यांनी त्यांची मोटरसायकल घेऊन हँडलला अडकवलेली कापडी पिशवी ओढून पसार झाले.
याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात दोन अनोळखी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुरी येथे दोन दिवसांपूर्वी दोन लाखाची रोकड पळवून नेल्याच्या घटनेचा तपास अद्याप लागलेला नसतानाच आता पुन्हा व्यापार्यांची रोकड पळविल्याने व्यापार्यांनी राहुरी पोलीस ठाण्यासमोर पोलिसांच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.