कांद्याचा तुटवडा; दोन महिने दर तेजीत राहणार

कांद्याचा तुटवडा; दोन महिने दर तेजीत राहणार

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

कांदा निर्यातीवर 40 टक्के कर आणि किमान कांदा निर्यातमूल्य प्रति टन 800 डॉलर केल्यानंतरही कांदा दरातील तेजी कायम आहे. दर्जेदार कांद्याला शेतकर्‍यांना 60 ते 70 रुपये किलो दर मिळत आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर हे दोन महिने कांद्याच्या दरातील तेजी कायम राहण्याचा अंदाज व्यापारी व्यक्त करीत आहेत.

उशिराच्या खरिपात लागवड केलेल्या कांद्याची काढणी डिसेंबरअखेरपासून सुरू होईल. त्यानंतर बाजारात आवक वाढून कांद्याचे दर कमी होतील. मात्र, यंदा खरीपपूर्व, खरीप आणि उशिराच्या खरीप हंगामात कांदा लागवड कमी झाली होती. त्यात पावसाने ओढ दिल्यामुळे कांदा उत्पादन कमी झाले आहे. मागील उन्हाळी हंगामातील कांदा अवकाळी पाऊस, गारपीट आणि उन्हाच्या झळांमुळे खराब झाला होता. त्यामुळे उत्पादनात घट येण्यासह कांदा जेमतेम साडेतीन महिने टिकला, त्यामुळे बाजारात कांद्याचा तुटवडा आहे. नवीन कांदा जानेवारीत बाजारात आल्यानंतर दर आवाक्यात येतील. सध्या सर्वच राज्यात कांद्याची दर तेजीत आहेत.

बाजार समित्यांमधून शेतकर्‍यांना दर्जानुसार 30 ते 60 रुपये प्रति किलो दर मिळत आहे. हा कांदा किरकोळ बाजारात येईपर्यंत वाहतूक, अडत, बाजार समित्यांचा कर, होलसेल आणि किरकोळ व्यापार्‍यांचा नफा गृहीत धरून प्रति किलो 50 ते 80 रुपयांवर जात आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com