
पाचेगाव |वार्ताहर| Pachegav
नेवासा तालुक्यातील पाचेगाव, कारवाडी व पुनतगाव या गावांना कांद्याचे माहेरघर मानले जाते. यंदा कांदा पीक काढणी नंतर भाव कमी असल्याकारणाने शेतकर्यांनी आपला कांदा व्यवस्थित चाळून (मोठा व लहान कांदा विभागून) चाळीत बंदिस्त केला. दर वाढीनंतरच कांदा मार्केटमध्ये न्यायचा हे कांदा उत्पादकांनी ठरविले असून त्यामुळे भावात सुधारणा होईपर्यंत शेतकरी चाळीतून कांदा बाहेर काढणार नाहीत.
मागील वर्षी नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये या भागात कांदा लागवडी मोठ्या प्रमाणात झाल्या होत्या, पण या भागातील आगास लागवडीच्या कांदा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला होता. त्यात या भागातील काही शेतकर्यांना आपल्या कांदा पिकावर अक्षरशः नांगर फिरवावा लागला, त्यात शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यातून सावरून शेतकर्यांनी आपली जमीन पुन्हा सज्ज करून उशीरा का होईना परत कांदा लागवडी केल्या व कांदा काढणी वेळेस मात्र कांद्याला कमी भाव मिळत असल्यामुळे शेतकर्यांनी कांदा चाळीत साठवून ठेवण्याचा निर्णय घेतला.
पण तीन-चार महिने उलटून देखील कांदा भावात अपेक्षित सुधारणा दिसून आली नाही. आज रोजी बाजार समित्यांमध्ये कांद्याला दहा ते बारा रुपये इतका भाव मिळत आहे. सुरुवातीला शेतकर्यांनी जोड व कमी दर्जाचा कांदा मार्केटमध्ये विकला, त्यामध्ये देखील काही शेतकर्यांना तोटा सहन करावा लागला. कांदा पिक आण्यासाठी आता अमाप खर्च होत आहे. उत्पादन देखील या भागातील शेतकरी चांगले घेतात, पण भाव मिळत नसल्यामुळे शेतकर्यांचा खर्च देखील मिळतो की नाही? हा प्रश्न निर्माण झाला आहे.
तीन-चार दिवसापासून या भागात पावसाच्या सरी सुरू आहे. त्यामुळे आर्द्रता वाढली आहे. त्यात कांदा चाळी मध्ये साठविलेल्या कांदा आर्द्रतेमुळे खराब देखील होण्याची भीती निर्माण झाली आहे. भाव नसला तरी चाळी तून कांदा विक्रीसाठी काढावा लागतो की काय अशी धास्ती शेतकर्यांनी घेतली आहे. एकीकडे धरलं तर चावत आणि सोडलं तर पळतं अशी अवस्था शेतकर्यांची साठविलेल्या कांदा पिकाची होत आहे. काही तज्ज्ञांच्या मते कांदा भावामध्ये चांगली सुधारणा घडण्याची चिन्हे आहेत. पण शेतकर्यांनी घाई न करता थोडे थांबून घेतले पाहिजे. त्यामुळे भाव वाढीपर्यंत या भागातील कांदा चाळी बंदिस्त दिसणार असल्याचे चित्र दिसत आहे.
कांदा भावात आणखी किमान हजार रुपये वाढीची अपेक्षा
एप्रिल व मे महिन्याच्या मध्यापर्यंत कांद्याचा भाव हजाराच्या आत होता. नंतर त्यात थोडी सुधारणा होवून भाव भाव 1200-1400 पर्यंत गेले. जूनच्या मध्यावर जास्तीत भावाने दोन हजाराचा टप्पा गाठला. हा भाव अतिउच्च प्रतिच्या कांद्याचा होता. जो दोन टक्के कांद्याला मिळाला. चांगल्या दर्जाच्या कांद्याचा भाव तेव्हा 1600 च्या आसपास होता. सध्या जास्तीत जास्त भाव 1700-1800 पर्यंत असला तरी तो दोन-चार टक्के कांद्यालाच मिळू शकतो. कितीही चांगल्या दर्जाचा कांदा असला तरी सध्या 1200 ते 1400 पर्यंतच भाव आहे. गोल्टीसह सामान्य दर्जाचा कांदा अजूनही हजाराच्या हात असल्याने आताच कांदा विकणे परवडणारे नाही. जास्तीत जास्त भाव तीन हजारापर्यंत जातील तेव्हाच कांद्याला सरासरी दोन हजारापर्यंत भाव मिळतील. असा भाव होईल तेव्हाच कांदा परवडेल. त्यामुळे शेतकरी तीन हजाराच्या टप्प्याची प्रतिक्षा करत आहेत.