कांद्याचे भाव कमी करण्यासाठी मोठे षडयंत्र - सुहास वहाडणे

कांदा
कांदा

पुणतांबा |वार्ताहर| Puntamba

कांद्याच्या भावात थोडी वाढ झालेली आहे. मात्र व्यापारी वर्ग शेतकरी व सरकारची दिशाभूल करून काद्यांचे भाव गगनाला भिडले आहेत असे चित्र निर्माण करत आहे. यामागे फार मोठे षडयंत्र असून हे हाणून पाडण्यासाठी शेतकर्‍यांनी संघटित आंदोलन करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख सुहास वहाडणे यांनी केले आहे.

गेल्या दोन दिवसापासून अनेक बाजार समितीमध्ये कांद्याचे भाव प्रति क्विंटल 3 हजार रुपयापेक्षा जास्त असल्याचे स्पष्ट केले जात आहे. प्रत्यक्ष विक्रीस आलेल्या कांद्याच्या गोण्यापैकी 10 ते 15 गोण्यांना हा भाव दिला जातो. इतर गोण्यांना दोन हजारापेक्षा कमी भाव मिळतो ही वस्तुस्थिती आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी कांद्याचे दर माध्यमांना देताना एकूण किती क्विंटल कांद्याची आवक झाली व प्रतवारी आणि वर्गवारीनुसार प्रत्येक कोणत्या प्रकारच्या कांद्याला किती भाव मिळाला याची सविस्तर माहिती देणे गरजेचे आहे.

सध्या कांद्याचे दर वाढल्याचे चित्र निर्माण केल्यामुळे केंद्र व राज्य सरकारने त्यांच्याकडील बफर स्टॉक बाजारपेठेत आणण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र याच सरकारने जून महिन्यात नाफेड मार्फत कांदा खरेदी पूर्व सूचना न देता बंद केली होती. त्यामुळे शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शेतकर्‍यांनी हजारो रुपये खर्च करून तत्कालिक परिस्थितीत कांद्याची साठवणूक केली आहे. प्रतिकूल वातावरणामुळे 50 टक्केपेक्षा जास्त कांदा सडलेला आहे. आता थोडा फार भाव मिळण्यास सुरुवात झाली तर व्यापार्‍यांनी स्वतःच्या फायद्यासाठी भाव वाढल्याचे चित्र निर्माण केले आहे.

राज्याच्या लोकप्रतिनिधींनी तसेच सरकारने खात्री करून भावाबाबत वस्तुस्थिती समजावून घेणे गरजेचे आहे. बफर स्टॉक बाजारपेठेत आणण्यापूर्वी ज्या व्यापार्‍यांनी 300 ते 400 रुपये क्विंटलने कांदा खरेदी करून साठेबाजी केलेली आहे त्यांच्याकडेही लक्ष ठेवले पाहिजे. बफर स्टॉक बाहेर काढला तर शेतकरी वर्गाचे नुकसान होते म्हणून शासनाने या प्रश्नात लक्ष घालावे. अन्यथा शेतकर्‍यांच्यावतीने धडक आंदोलन करण्याचा इशाराही श्री. वहाडणे यांनी दिला आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com