कांद्याचा भाव भिडला ४७०० रुपयांवर

कांद्याचा भाव भिडला ४७०० रुपयांवर

अहमदनगर (प्रतिनिधी)

गत पंधरा दिवसांपासून संततधार तर कधी मुसळधार पावसामुळे दक्षिणेकडील आंध्रप्रदेश आणि कर्नाटक राज्यांमधून नवीन लाल कांदा उशिराने बाजारात दाखल होणार आहे.

नगर जिल्ह्यासह राज्यातील शेतकऱ्यांनी चाळीत साठवून ठेवलेला उन्हाळ कांदा खराब होत असल्याने मागणी आणि पुरवठा यात तफावत निर्माण झाली आहे. यामुळे कांद्याच्या बाजारभावात दिवसागणिक वाढ होऊ लागली आहे.

पारनेरात काल उत्तम प्रतीचा उन्हाळ कांदा १००० ते ४७०० रुपये प्रतिक्विंटल विकला गेला. अकोलेत उन्हाळ कांदा ४०० ते ४१०० रुपये, कोपरगावात १२०० ते ४१०० रूपये प्रतिक्विंटल विकला गेला. कांद्याचे भाव वाढत असल्याने गृहिणींचे बजेट बिघडू लागले आहे. पारनेरचा दर या हंगामातील विक्रम आहे.

शेतकऱ्यांनी मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये चाळीमध्ये कांदा साठवून ठेवलेल्या कांद्यावर बदलत्या वातावरणामुळे परिणाम होऊन त्याच्या वजनात आणि प्रतवारीमध्ये कमालीची घट येत असल्याने वाढलेल्या भावाचा शेतकऱ्यांना फारसा फायदा होताना दिसत नाही.

कांद्याला चांगला भाव मिळत असल्याने उत्पादक शेतकरी खूश असले तरी कांद्याच्या भावात वाढ होत असल्याने गृहिणींचे बजेट बिघडू लागले आहे. नवीन कांद्याचेही प्रचंड नुकसान झाल्याने काही दिवस कांद्याला तेजी राहणार आहे.

Related Stories

No stories found.