कांदा भाव प्रश्नी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा राहुरीत रास्तारोको

सरकारच्या शेतीविषयक चुकीच्या धोरणामुळे जगाचा पोशिंदा आला रस्त्यावर- रविंद्र मोरे
कांदा भाव प्रश्नी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा राहुरीत रास्तारोको

राहुरी |तालुका प्रतिनिधी|Rahuri

कांद्याला मिळत असलेल्या अत्यल्प बाजार भावामुळे तसेच सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे जगाचा पोशिंदा रस्त्यावर आलाय, सरकारने बळीराजाची क्रुरचेष्टा चालवली आहे, असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रविंद्र मोरे यांनी रास्तारोको आंदोलन प्रसंगी केले.

राहुरी बाजार समितीच्या मुख्यप्रवेशद्वारासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटना व कांदा उत्पादक शेतकर्‍यांनी जिल्हाध्यक्ष रविंद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली आक्रमक होत नगर मनमाड रस्त्यावर कांदा ओतून देत रास्तारोको आंदोलन केले.राज्यभरात कांद्याला मिळत असलेला अत्यल्प बाजारभाव यामुळे कांदा उत्पादक संकटात सापडलेला आहे उत्पादन खर्चही फिटेना, अशी स्थिती असून याबाबत शासनाने लवकरच कांद्याबाबत धोरण स्पष्ट करत किमान 2500 रुपये बाजारभाव मिळावा, अशी मागणी करतानाच विक्री झालेल्या कांद्याला 500 रुपये प्रति क्विंटल अनुदान जाहीर करावे अशी मागणी करतानाच सध्या शेतकर्‍यांच्या कुठल्याही शेतमालालाला बाजारभाव हा कवडीमोल मिळत आहे.

तर दुसरीकडे शेतकर्‍यांचे वीज कनेक्शन कट करण्याचे धोरण राबवून शासन शेतकर्‍यांना अधिकच संकटात टाकत आहे.अधिकार्‍यांनी वीज कनेक्शन कट केले नाही तर त्यांना सस्पेंड करण्याचे आदेश सरकार देत आहे. हे चुकीचे असून जर सरकारने आपले धोरण बदलले नाही तर येत्या 2024 ला सरकारला सस्पेंड केल्याशिवाय शेतकरी शांत राहणार नाहीत, असा इशारा मोरे यांनी दिला. आजचे आंदोलन हे प्रातिनिधीक स्वरुपाचे असून दखल घेतली नाही तर तीव्र आंदोलन करू अशी भूमिका मांडली.याप्रसंगी कांदा उत्पादकांनी ट्रॅक्टर ट्रॉलीतून आणलेला कांदा रस्त्यावर ओतून देत निषेध नोंदवला.

यावेळी बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे, सुरेश बाफना, प्रकाश देठे, दीपक तनपुरे, बाळासाहेब जाधव, पिंटूनाना साळवे, संतोष आघाव, पांडू उदावंत, सचिन म्हसे, आनंद वने, बाळासाहे जाधव, सतीश पवार, राहुल करपे, अशोक निमसे, सतीश निमसे, अशोक चौधरी, सचिन उंडे आदी उपस्थित होते.आंदोलन प्रसंगी नायब तहसीलदार संध्या दळवी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले तर राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मेघश्याम डांगे यांच्या मार्गदर्शनात राहुरी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. रास्तारोकोमुळे रस्त्याच्या दूतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com