
टाकळीभान |वार्ताहर| Takalibhan
संपूर्ण उन्हाळ्याचे काही दिवस सोडले तर सातत्याने अवकाळीचा फटका शेती पिकांना बसत आहे. मे महिन्यातही अवकाळी पावसाने शेतकर्यांचा पिच्छा सोडला नसल्याने श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभानसह बहुतांशी भागात वादळी वार्यासह पाऊस तसेच गारपीट होत असल्याने याचा प्रामुख्याने फटका हा उन्हाळ कांद्याला बसत असल्याने बाजारभाव कोसळल्याने मुख्य पीक असलेल्या कांद्याचा वांधा झाल्याने बळीराजावर ढसाढसा रडण्याची वेळ आली आहे. बळीराजाचे आश्रु पुसायला कोणीच तयार नसल्याने अवस्था बिकट झाली आहे.
उसाचे आगार म्हणून श्रीरामपूर तालुक्यालाची राज्यात ओळख आहे. परंतू मोसमी पावसाच्या घटत्या प्रमाणामुळे पाणी पातळी घटल्याने जेमतेम पाण्यावर उभ्या केलेल्या ऊस शेतीला ऊसतोडणीचे ग्रहण दिवसेंदिवस वाढत असल्याने नगदी पिक म्हणून शेतकर्यांनी कांदा पिकाला पसंती दिली आहे. उसाची जागा कांद्याने घेतल्याने लागवडीच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. कमी पाणी व कमी कालावधीत निघणारे हे पीक असल्याने व उसापेक्षा जास्त पैसे देत पदरात पडत असल्यामुळे बळीराजाने कांदा पिकाला पसंती दिली. मात्र तिथेही दुर्दैवाने शेतकर्याची पाठ सोडली नाही.
रब्बी हंगाम सुरू होताच लागवड करण्यासाठी टाकलेल्या रोपांचा खरीप हंगामातील अतिवृष्टीने सुपडा साफ केला. त्यात मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागला. रब्बी हंगामी उन्हाळ लागवडीची कांदा रोपे पुन्हा नव्याने टाकावी लागली. मार्च, एप्रिल व मे महिन्यात सुरू झालेल्या कांदा काढणीला अवकाळीने वेळोवेळी फटका दिला. ऐन कांदा काढणीच्या वेळेसच अवकाळीने धुमाकूळ घालण्यास सुरूवात केली. शेतात काढलेला कांदा उघड्या डोळ्यांनी भिजत असल्याचे पाहण्याची वेळ शेतकर्यावर आली.
बाजारात भिजलेल्या कांद्याची प्रतवारी व्यापार्यानी पंचर म्हणून केल्याने दर गडगडले. कांद्याचा बाजारभाव 4 ते 5 रुपयावर स्थिर झाला आहे. डिसेंबर, जानेवारी मध्ये एकाचवेळी बहुतांशी शेतकर्यांनी कांदा लागवड केली. त्याच कांद्याची काढणी आता सुरू झाली असतानाच अवकाळीने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे कांदा काढणी, कांदा वाहतूक व चाळी भरण्यासाठी मोठी झुंबड उडाली आहे.
ठिकठिकाणी रानोमाळ कांदा काढण्याचे काम सुरू असून काही ठिकाणी रानातच पोळी लावण्यात आल्या आहे. बाजारभाव नसल्याकारणाने कांदा पडून आहे. तोच कांदा घरी आणून चाळी भरण्याचे काम सुरू आहे. त्यातच अवकाळीचा कहर सुरूच असल्याने कांदा भीजू नये यासाठी बारदाना खरेदी करावा लागत आहे. शेतातील कांद्याच्या गाभ्यात अवकाळी पावसाचे पाणी गेल्याने हा कांदा पंक्चर झाल्याने जागेवरच सडत आहे. हाच कांदा चाळीत टाकण्यायोग्य नसल्याने मिळेल त्या भावात विकावा लागत आहे.
नाहीतर फेकून देण्याची वेळ आली आहे. अचानक येणार्या वादळी वार्यासह आलेल्या पावसाने कांदा पोळ झाकण्या आधीच भिजली जात असल्याने शेतकर्यांचे आतोनात नुकसान होत आहे. एकीकडे कांद्याला बाजारभाव नाही तर दुसरीकडे अवकाळी अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे. उत्पादन खर्चही वसूल होत नसल्याने कर्जाचा डोंगर शिरावर असल्याने ढसाढसा रडण्याची वेळ बळीराजावर आली आहे. मात्र बळीराजाचे आश्रु पुसण्यासाठी कोणीच येत नसल्याने अवस्था केविलवाणी झाली आहे.