
पिंपरी निर्मळ |वार्ताहर| Pimpari Nirmal
खरिपातील अतिवृष्टीमुळे शेतकर्यांचे कंबरडे मोडले होते. मात्र चांगला पाऊस असल्याने रब्बीतील पिके साथ देतील व खरिपात झालेले नुकसान भरून काढता येईल या हिशोबाने यावर्षी शेतकर्यांनी कांदा पिकाला पसंती दिली होती. मात्र अवकाळी पावसाने व गारपिटीने कांदा पिकाचे प्रचंड नुकसान झाले. मिळालेल्या उत्पन्नातून झालेला खर्च निघाला नसून कांदा पिक तोट्यात गेल्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे.
चांगला पाऊस झाल्यामुळे शेतकर्यांना यावर्षी रब्बी पिकाकडून मोठ्या अपेक्षा होत्या. कांदा हे पीक नगदी असल्याने व तयार झाल्यानंतर साठवणुकीची व्यवस्था करता येत असल्याने शेतकर्यांनी कांदा लागवड केली होती. मात्र ऐन काढणीच्या वेळेस झालेल्या गारपीट व अवकाळी पावसाने शेतकर्यांची तारांबळ उडून दिली. या पावसाने कांद्याच्या प्रतीवर व टिकवण क्षमतेवर प्रतिकूल परिणाम केला.
पाऊस लागल्याने काढलेला कांदा मोठ्या प्रमाणावर सडला. उरलेला कांदा साठवणे शक्य झाले नाही. त्यामुळे मिळेल त्या भावात शेतकर्यांना हा कांदा विकावा लागला. दरम्यान व्यापार्यांनी शेतकर्यांच्या अडचणीचा पुरेपूर फायदा घेत कांद्याचे भाव पाडले. कांद्याला एकरी 60 हजारापर्यंत खर्च आला. मात्र कांद्याच्या विक्रीतून मिळालेले उत्पन्न अवघे वीस हजारांच्या आसपास गेले. त्यामुळे शेतकर्याला एकरी 40 हजार रुपयांचा तोटा झाला.
खरिपात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकर्यांचे प्रचंड नुकसान आधीच झाले होते. त्यात कर्ज पाणी घेऊन उभे केलेले कांद्याच्या पिकानेही वांदा केल्यामुळे शेतकरी वर्ग पुरता हैराण झालेला आहे. शासनाने कांदा पिकासाठी अनुदान देण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
कांदा लागवडीसाठी रान तयार करणे, रोपाचा खर्च, काढणी, बारदाने आदींसाठी जवळपास एकरी 60 हजार रुपये खर्च आला. मात्र अवकाळी पावसाचे पाणी लागल्याने कांद्याचा रंग बदलला. काही कांदा सडला. उर्वरित कांदा साठवणूक करणे शक्य नसल्याने मिळेल त्या भावात विकावा लागला.त्यामुळे एकरात कांद्यापासुन 20 हजार उत्पन मिळाले. एकरी 40 हजार रुपये तोटा झाला. हीच स्थिती बहुतांश शेतकर्यांची झाली आहे.
- नानासाहेब वर्पे, कांदा उत्पादक शेतकरी पिंपरी निर्मळ