अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

गेल्या काही महिन्यांपासून तेजीत असणारा कांदा आता पुन्हा घसरण्यास सुरूवात झाली आहे. शनिवारी (दि.5) नगर जिल्ह्यातील विविध बाजार समित्यांमध्ये भावात घसरण झाली.

विशेष म्हणजे नेहमी उन्हाळी कांद्याला भाव जादा असतो. पण सध्या या कांद्याची प्रत चांगली नसल्याने भाव कमी मिळत आहे. भाव गडगडल्यानेे कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत पडला आहे. सरकारने निर्यातबंदी त्वरीत उठवावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत झालेल्या लिलावात लाल कांद्याला तीन हजार तर गावरान कांद्याला दोन हजार प्रती क्विंटल भाव निघाला. यामुळे हजारो रुपये खर्च करून पिकविलेल्या कांद्याला भाव नसल्याने शेतकर्यांची पुन्हा आर्थिक कोंडी होणार आहे.

यंदा उन्हाळी कांदा शेतकर्यांकडे मोठ्या प्रमाणात होता. करोना लॉकडाऊनमुळे व्यापारी कारणासाठी कांद्याचा वापर झालाच नाही. केवळ घरगुती वापरासाठी कांदा विक्री झाल्याने उन्हाळी गावरान कांदा मोठ्या प्रमाणात शिल्लक आहे. लॉकडाऊन टप्प्या टप्प्याने उठविल्यावर सुरूवातीला आवक कमी असल्याने कांद्याचे भाव वाढले.

ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये कांदा तब्बल दहा हजारांपर्यंत पोहचला होता. नोव्हेंबरमध्ये पाऊस थांबल्यानंतर हळूहळू कांदा बाजारात येऊ लागला. दरम्यानच्या काळात शासनाने इजिप्तवरूनही कांद्याची आयात केली. त्यामुळे एकदम वर गेलेले कांद्याचे दर आता गडगडू लागले आहेत. गत पंधरा दिवसांपासून बाजारात मोठ्या प्रमाणात लाल कांद्याची आवक होत असल्याने गावरान कांद्यालाही कमी भाव मिळू लागला. यात लाल कांदा बाजी मारतांना दिसत आहे.

नगर बाजार समितीत शनिवारी झालेल्या लिलावात 12 हजार 797 क्विंटल गावरान कांद्याची आवक होऊन प्रथम प्रतवारी च्या कांद्याला 2 हजार ते 2 हजार 400 रुपयांचा भाव मिळाला. याशिवाय 9 हजार 632 क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. त्याला 2 हजार 500 ते 3 हजार रुपयांचा भाव मिळाला.

गेल्या तीन महिन्यांपासून तेजीत असणारा कांदा आता हळूहळू कमी होत असल्याने शेतकर्यांची चिंता वाढली आहे. दुसरीकडे सध्या शेतकर्यांनी मोठ्या प्रमाणात लाल कांद्याची लागवड केली आहे. हा कांदा जेव्हा बाजारात येईल त्यावेळीही कांद्याच्या बाजार भावावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

लाल कांद्याचे उत्पादन घटले

यंदा परतीचा आणि अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात कांद्याचे उत्पादन घटले आहे. उत्पादन घटल्याने आणि कांद्याला भाव नसल्याने पावसाच्या तडाख्यातून कसा बसा वाचवलेल्या कांद्याच्या कमी दरामुळे शेतकर्यांचे आर्थिक गणित कोलमडणार आहे.

असे निघाले भाव... (प्रति क्विंटल)

श्रीगोंदा-  500 ते 2500 रू

वांबोरी- लाल 500 ते 3100 रू.

उन्हाळी 300 ते 2000 रू.

वैजापूर- लाल 500 ते 2500 रू.

शेवगाव- 1नं. 3000 ते 4000 रू.

2नं. 2000 ते 2900 रू.

3नं. 2000 ते 2900 रू.

कोपरगाव- उन्हाळी 500 ते 2027 रू.