
चांदा |वार्ताहर| Chanda
नेवासा तालुक्यातील चांदा आणि परिसरात उन्हाळी कांद्याची परिस्थिती भयानक झाली आहे. कांदा चाळीत जाण्याच्या अगोदरच सडू लागला आहे. त्यामुळे कांदा बाजारात येण्याऐवजी पुन्हा एकदा शेतात चालला आहे, अशा भयानक परिस्थितीमुळे बळीराजा खचुन चालला आहे.
कपाशीने दगा दिल्यानंतर नव्या उमेदीने शेतकर्यांनी उन्हाळी कांदा पिकासाठी कंबर कसली होती. पण निर्सगाच्या मनात काही वेगळेच होते. गत दोन महिन्यात वारंवार आलेल्या अवकाळीने कांदा पिकाला जबर फटका बसला आणि उत्पादन निम्म्यावर आले. तरीही बळीराजाने कांदा काढणी केली. कांदा काढणीसाठी नऊ हजारापासून बारा हजारापर्यंत एकरी भाव होता. कांदा काढणी झाली पोळही लावल्या गेल्या. मात्र लावलेल्या पोळीच्या पोळी सडू लागल्या आहेत. काहींनी तर कांदा गोळा करण्याऐवजी त्यात रोटा मारून टाकला. खराब कांदा आता बळीराजा पुन्हा शेतात टाकून देत आहे.
बाजारात कांद्याच्या भावाची पार वाट लागली आहे. कांद्याला अवघा एक रुपयापासून दर मिळत असल्याने कांदा बाजारात आणण्याऐवजी शेतात फेकून दिला जात आहे. ऊन, वारा, पाऊस कशाचीही तमा न बाळगता तळहाताच्या फोडाप्रमाणे जीव लावलेल्या कांद्याला पुन्हा शेतात फेकताना बळीराजाच्या काळजात होणारी घालमेल सून्न करणारी आहे.
महागडी खते, वाढती मजूरी, फवारणी आदि मिळून एकरी पंचावन्न ते साठ हजार घालून आणलेला कांदा पुन्हा शेतात फेकण्याची वेळ बळीराजावर आली आहे. आता शेताची मशागत करणे तसेच पुन्हा खरीपाच्या पिकाची तयारी करण्यासाठी शेतकरी मोठ्या आर्थिक विवंचनेत आहे. अतिवृष्टी व अवकाळीची कुठलीही मदत न मिळाल्याने बळीराजाची आर्थिक घडी विस्कटली आहे.