
वळण |वार्ताहर| Valan
शेतातील कांदा काढण्यासाठी शेतकर्यांची धावपळ सुरू असून कांदा काढणीसाठी मजूर मिळत नसल्यामुळे व अवकाळीच्या संकटामुळे शेतकरी हतबल झाला आहे.
राहुरी तालुक्याच्या वळण परिसरात सध्या कांदा काढणीचा हंगाम सुरू आहे. कांदा काढणीसाठी मजुरांचा तुटवडा निर्माण झाल्याने व अवकाळी पावसाच्या भितीने शेतकर्यांनी मजुराची वाट न पाहता घरातील लहान मोठ्या सर्व सदस्यांना घेऊन कांदा काढणीला सुरूवात केली आहे. एकीकडे कांद्याला भाव नाही. तो काढणीसाठी मजूर मिळत नाही. काढलेला कांदा घरापर्यंत आण्यासाठी साधने नाहीत, यामुळे शेतकरी पुरता हैराण झाला आहे.
कांदा लागवडीपासून तर कांदा काढणीपर्यंत कांद्याची रोपे, कांद्याची लागवड, खुरपणी, फवारणी, खते यासाठी शेतकर्यांनी वारेमाप पैसे खर्च करून कांदा पीक घेतले. सुरुवातीला हवामान कांद्याला पोषक असल्याने कांद्याचे पीक जोमदार आले. मात्र, ऐन काढणीच्या वेळी अवकाळी पावसाने शेतकर्यांच्या स्वप्नावर पाणी फेरले. काढलेला कांदा भिजल्यामुळे चाळीत किती दिवस टिकतो, याची शास्वती सुद्धा नसल्याने शेतकरी पैसा खर्च करून चाळी तयार करून कांद्याची साठवण करीत आहेत.
अनेकांचा तर कांदा पावसाने भिजल्याने तसाच शेतात पडून आहे. तर काहींनी काढलेला कांदा प्लास्टीकच्या साह्याने झाकून ठेवला आहे. या सर्व कांद्यांचा शासनाने पंचनामा करून कांदा उत्पादक शेतकर्यांना अर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.