गडगडलेल्या दरांनी कांदा उत्पादक आर्थिक संकटात

नगदी असणारा कांदा आज शाश्वत अर्थशास्त्राच्या प्रतिक्षेत
कांदा उत्पादक
कांदा उत्पादक

वीरगाव |वार्ताहर| Virgav

बाजारात कमी मागणी आणि निर्यात सुरू असली तरी ती वेगाने होत नसल्याने सहा-सात महिन्यांपासून साठलेला कांदा शाश्वत अर्थशास्त्राच्या ( इकॉनॉमी ऑफ पर्मनन्स) प्रतिक्षेत आहे. बाजारभाव नसल्याने कांदा उत्पादकांवर आर्थिक संकट आले असून उत्पादन खर्चही मिळण्याची मारामार झाली.

एप्रिल-मे महिन्यात बाजारभावाच्या आशेने साठविलेल्या कांद्याचे मुसळधार पडणार्‍या मोसमी पावसाने मोठे नुकसान केल्याची माहिती कांदा उत्पादकांनी दिली. पावसाळी वातावरणात हवेतील आर्द्रता वाढल्याने साठविलेला कांदा इतका सडला की निम्मा कांदाही बाजारात जाण्याची शाश्वती नाही. काही प्रमाणात दर्जेदार आणि निर्यातक्षम कांदा बाजारात जात असला तरी व्यापार्‍यांच्या संगनमताने दर पाडल्याची शंका शेतकरी व्यक्त करतात. कांदा उत्पादक शेतकर्‍याकडे राज्याबरोबरच केंद्र सरकारही दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप अकोले तालुक्यातील वीरगावचे कांदा उत्पादक रावसाहेब किसन अस्वले यांनी केला.

हिवाळ्यात कांद्याची लागवड केली जाते. कांद्याचे पोषण सुरू होते तसतशी तापमानात वाढ होते. काढणीच्या कालखंडात वातावरणातील उष्णतेची वाढ कांदापिकाला पोषक ठरते. यंदा मात्र तापमानातील आकस्मिक घट-वाढ कांदा उत्पादनाला बसली आणि उत्पादनात मोठी घट झाली.

चाळीत साठलेला कांदा पाच महिन्यांपर्यंत सुस्थितीत राहतो. यंदा मात्र बाजारभाव मिळतील या आशेने तो अधिक काळ चाळीत पडून राहिला.आता हाच कांदा विक्रीला काढल्यानंतर सौदे वेळेवर होत नाहीत, सुट्टीचा दिवस वगळूनही कामगार नाहीत, मागणी नाही या सबबीखाली अनेक ठिकाणी बाजार बंद ठेऊन भाव पाडले जातात. पर्यायाने आवक वाढून मागणी नसल्याने दरात आणखी घसरण होते. इतके महिने साठविलेला कांदा आता 900 ते 1300 रुपये क्विंटल दराने जातो. ज्यातून शेतकर्‍याला त्याचा उत्पादन खर्चही मिळणे मुश्कील झाले आहे.

दर पडल्यानंतर व्यापारी कमी दराने कांदा खरेदी करून चांगल्या दर्जाचा कांदा साठवून ठेवतात. शेतकर्‍यांकडील उपलब्ध कांद्याची माहिती कृषी विभाग आणि सरकार तंतोतंत ठेवते.व्यापार्‍यांकडील शिल्लक कांद्याची माहिती मात्र कधीच बाहेर येत नाही. ही सर्व माहिती सरकारने काटेकोर घेतल्यास आपल्या देशाची नेमकी गरज आणि जागतिक बाजाराची मागणी लक्षात घेऊन निर्यात धोरण ठरविता येऊ शकते.

ही नेमकी माहिती मिळत नसल्याने किरकोळ बाजारातील दर वाढू नये म्हणून केंद्र सरकार कांदा निर्यातीवर मर्यादा आणते आणि नेमका यामुळेच शेतकर्‍यांना तोटा होतो. सरकारचा नेमका अंकुश नसल्याने या क्षेत्रातील व्यापारी आणि दलालांची मिलीभगत कांदा उत्पादकांसाठी मारक ठरते. सध्याची परिस्थितीही वेगळी नसल्याने नैसर्गिक संकट आणि कृत्रिमरित्या पाडलेले बाजारभाव ही दोन्ही कारणे कांदा उत्पादकांना आर्थिक संकटात टाकणारी ठरली आहेत.

कांदा काढणीवेळी प्रचंड उष्णता होती. त्यामुळे काही कांदा जमिनीत सडला. कांदापात जळून गेल्याने तो योग्यप्रकारे पक्व झाला नाही. परिणामी आकार कमी राहिल्याने उत्पन्नात घट झाली. नैसर्गिक आपत्तीने साठविलेल्या चांगल्या कांद्यातही निम्म्यापेक्षा अधिक घट झाली. मागणी नाही किंवा निर्यातीवर प्रतिबंध येत असल्याचे व्यापारी सांगत आहेत. आज 9 ते 13 रुपये प्रतिकिलोने शेतकर्‍यांकडून खरेदी केलेला कांदा मात्र किरकोळ बाजारात प्रतिकिलो 70 ते 80 रुपये कसा विकला जातो? याचा अर्थ शेतकरी आणि ग्राहक यांची पध्दतशीर पिळवणूक करून भलतेच तुंबड्या भरत आहेत.

- रावसाहेब किसन अस्वले, कांदा उत्पादक, वीरगाव, अकोले

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com