
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
राज्य शासनाकडून कांदा उत्पादक शेतकर्यांना 350 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे 1 फेब्रुवारी 2023 ते 31 मार्च 2023 या कालावधीमध्ये शेतकर्यांनी राहाता बाजार समितीमध्ये विक्री केलेल्या कांद्यास अनुदान मिळणार असून शेतकर्यांनी राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीकडे त्वरित संपर्क साधून आपले कांदा अनुदानाचे अर्ज दाखल करावेत, असे आवाहन बाजार समितीचे प्रशासक रावसाहेब खेडकर यांनी केले आहे.
फेब्रुवारी 2023 व मार्च 2023 या कालावधीमध्ये ज्या कांदा उत्पादक शेतकर्यांनी राहाता बाजार समितीमध्ये कांद्याची विक्री केलेली आहे अशा शेतकर्यांना शासनाकडून 350 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे अनुदान मिळणार आहे. त्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून देणे शेतकर्यांना बंधनकारक आहे. कांदा अनुदान मागणीचा अर्ज बाजार समितीने मोफत उपलब्ध करून दिलेला आहे.
शेतकर्यांनी बाजार समितीकडे अर्ज करताना त्या अर्जा सोबत विक्री केलेल्या कांद्याच्या हिशोबाच्या पट्ट्यांची मूळ प्रत अथवा झेरॉक्स प्रत, बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची सुस्पष्ट झेरॉक्स प्रत, आधार कार्डची झेरॉक्स प्रत, तसेच कांदा पिकाची नोंद असलेला सातबारा उतारा इत्यादी कागदपत्रे जोडावीत, असे आवाहन बाजार समितीचे प्रशासक, रावसाहेब खेडकर व सचिव उद्धव देवकर यांनी केले आहे.