कांदा अनुदानाच्या अर्जासाठी मुदतवाढ!

30 एप्रिलपर्यंत अर्ज करता येणार
कांदा
कांदा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

2022- 2023 या वर्षात राज्यातील कांदा उत्पादक शेतकर्‍यांना प्रतिक्विंटल 350 रुपये अनुदान देण्याचे राज्य शासनाने जाहीर केले आहे. त्यासाठी आता 30 एप्रिलपर्यंत अर्ज करता येणार आहेत. अनेकजण अर्ज करण्यापासून वंचित राहतील म्हणून पणन संचालक कार्यालयाने मुदतवाढ देण्याचे आदेश काल गुरुवारी काढले. या निर्णयामुळे नगर जिल्ह्यासह राज्यातील कांदा उत्पादकांना दिलासा मिळाला आहे.

राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या, खाजगी बाजार समित्यांमध्ये, पणन अथवा नाफेडकडे 1 फेब्रुवारी ते 31 मार्च 2023 या कालावधीमध्ये कांदा विक्री केलेल्या शेतकर्‍यांना प्रतिक्विंटल 350 रुपये व जास्तीत जास्त 200 क्विंटलच्या मर्यादेत अनुदान दिले जाणार आहे. त्यासाठी कांदा उत्पादक शेतकर्‍यांना कांदा अनुदान योजनाचा लाभ घेण्याकरिता विहीत नमुन्यातील अर्ज भरून द्यावा लागणार आहे.

शेतकर्‍यांनी अर्ज ज्या ठिका णी कांदा विक्री केला, त्या कृषी उत्पन्न बाजार समिती, खाजगी बाजार, थेट पणन अनुज्ञप्तीधारक, नाफेड खरेदी केंद्र प्रमुख यांच्याकडे वेळेत सादर करावेत, असे पणन संचालक यांनी कळविले आहे. आता पुन्हा मुदतवाढ मिळणार नाही. दरम्यान, शेतकर्‍यांच्या अर्जांची तालुका व जिल्हा स्तरावर पडताळणी होईल. त्यानंतर पणन संचालकांच्या माध्यमातून शासनाला प्रस्ताव जाईल. त्यानुसार शासन शेतकर्‍यांच्या खात्यात पैसे जमा करणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com