
देवळाली प्रवरा |वार्ताहर| Deolali Pravara
ज्या कांद्याच्या पिकासाठी बाजारपेठेत कांदा बियाणापासून ते रासायनिक खत, किटकनाशक व कांदा भुसार्यासाठी लागणारे साहित्य तार, बांंबू, बल्ल्या, बारदाणा, सुतळी, स्टीलपासून मजुरापर्यंत कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली. वरील सर्व मंडळी यामध्ये मालामाल झाली. परंतु कांदा पिकातून दोन पैसे हातात पडतील, म्हणून जिवाचा आटापिटा करणारा शेतकरी कांद्यांचे भाव पडल्याने यापासून मात्र, उपेक्षितच राहिला.
उसापासून उदासिन झालेला शेतकरी कमी दिवसाचे नगदी पीक म्हणून कांदा पिकाकडे वळला. परंतु आज कांद्याला रुपया, दोन रुपये किलोचा भाव मिळत आहे. रुपया किलोने कांदा गेल्याने नुकत्याच एका शेतकर्याला विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याची वेळ आली. कांदा पिकातून आपल्याला दोन पैसे मिळतील.कुटुंबाला आर्थिक हातभार लागेल, म्हणून शेतकर्यांनी मोठ्या प्रमाणावर खर्च केला.सुरुवातीला ट्रॅक्टर मालकाकडून इंधन दरवाढ झाल्याने 2 हजार 500 रुपये एकराप्रमाणे नांगरट करून घेतली.
2 हजार 500 रुपये प्रमाणेच रोटा मारला. 1 हजार 500 रुपये प्रमाणे सरी काढली किंवा वाफे व बेड तयार केले. 2 हजार रुपये एकराने मजुरांनी रानाची बांधणी केली. 3 हजार 200 रुपये किलोने आणलेले बी टाकले.त्याचे रोप तयार करण्यासाठी लागलेला खर्च वेगळा! एकरी चार गोण्या रासायनिक खतांच्या त्याचे 6 हजार रुपये, कांदा लागवड एकरी 11 हजार रुपये, दर आठ दिवसाला मारावा लागणारा महागड्या किटकनाशकाचा फवारा, कांदा खुरपणी एकरी 4 हजार रुपये, कांदा विरळणी वेगळीच, कांदा काढणी एकरी 11 हजार रुपये, वाहतूक सहाशे रुपये ट्रेलर, कांदाभराई साडे पाचशे रुपये, कांदा साठवणीसाठी भुसारा तयार करण्यासाठी एकरी 50 हजार रुपये, कांदा भुसार्यात भरणे 1 हजार रुपये ट्रेलर, इतक्या मोठ्या प्रमाणात खर्च झालेला कांदा रुपया अन् दोन रुपये किलो गेला तर त्या शेतकर्यांसमोर आत्महत्या करण्याशिवाय दुसरा कोणता पर्यायच उरत नाही.
यासाठी सरकारने कांदापिकाला हमीभाव देणे गरजेचे आहे. शासकीय कांदा खरेदी सुरु होऊन सरकारने बफरस्टॉकचे नियोजन करुन तातडीने निर्यातीला परवानगी दिली तर शेतकर्यांच्या हातात दोन पैसे पडतील व शेतकर्यांच्या आत्महत्या तरी थांबतील, अशी शेतकर्यांची अपेक्षा आहे.
कांदा भुसार्यासाठी लागणारे बांबू, बल्ल्या विक्रेत्यांची रोज 60 ते 70 हजारांची विक्री होती. एका बांबूचा भाव 70 ते 80 रुपये, एका बल्लीचा भाव 225 ते 300 रुपये, तार 90 रुपये किलो, भुसारा उभा करणे मजुरी 300 रुपये फूट, प्लास्टिक बारदाणा 250 मायक्रोन 170 रुपये किलो, 350 मायक्रोन 250 ते 300 रुपये किलो, दोरी 120 रुपये किलो, कलतन 190 रुपये किलो, लोखंडी जाळ्या करण्यासाठी स्टील 90 रुपये किलो, कोंबडी जाळी 45 रुपये फूट, मजुरी 150 ते 200 रुपये फूट याप्रमाणे दर सुरू होते. यामुळे वरील सर्व विक्रेत्यांची कोट्यवधींची विक्री झाली व ते अक्षरशः चांदी झाली. मात्र, हे सर्व उत्पन्न ज्याच्यापासून मिळाले तो शेतकरी कांद्याला भाव नसल्याने रोज अश्रू ढाळत कधी भाव वाढतील? याची चातकाप्रमाणे वाट पाहात आहे.