रडवणार्‍या कांद्यावर रोटर फिरवण्यासाठी तरी अनुदान द्या!

नगर जिल्ह्यातील शेतकर्‍याच्या मुलाचं थेट राष्ट्रपतींना पत्र
रडवणार्‍या कांद्यावर रोटर फिरवण्यासाठी तरी अनुदान द्या!

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शेती उत्पादनाला दर मिळत नसल्याने अनेक शेतकरी थेट पिकात रोटर फिरवत आहेत. आता कांदा व अन्य उभ्या पिकांवर रोटर फिरवण्यासाठी तरी अनुदान द्या, अशी मागणी महाराष्ट्रातील एका शेतकर्‍याच्या मुलाने केली आहे. यासाठी त्याने थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहिलं आहे. शुभम गुलाबराव वाघ असं या तरुणाचं नाव असून तो अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड येथील रहिवाशी आहे.

शेतकर्‍याच्या मुलाने राष्ट्रपतींना पाठवलेलं पत्र जसेच्या तसे

महोदया, आज शेतकर्‍यांची परिस्थिती दयनीय झाली आहे. त्यांनी पिकवलेल्या शेतमालाला कवडीमोल दर मिळत असल्याने उभ्या पिकात रोटर फिरवावा लागत आहे. कांदा उत्पादक शेतकर्‍यांची बाजारात चेष्टा केल्याप्रमाणे 500 ते 600 किलो कांदा विकून फक्त दोन रुपयांची पट्टी हातात मिळतेय. कांदा उत्पादक शेतकरी अक्षरशः रडकुंडीला आला आहे. कोबी, फ्लॉवर, कांदा आणि मोठा खर्च करून केलेली केळीच्या बागेतही रोटर फिरवण्याची वेळ शेतकर्‍यांवर येत आहे.

एकीकडे महागाई वाढल्यामुळे शेतीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागत आहे. पण खर्चाच्या निम्म्या रकमे इतकाही नफा शेतकर्‍यांना मिळत नाहीये. तसेच शेतमाल निर्यात होत नसल्याने बाजारात आवक वाढतेय. त्यामुळे आशा लावून बसलेल्या शेतकर्‍यांना त्यांच्या शेतमालाला कवडीचाही दर मिळत नाहीये. आता शेतकर्‍यांनी शेती करावी की नाही? हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित होतोय. कुठलंही पीक घेतलं तरी तिचं अवस्था आहे. पण त्यांच्याकडे दुसरा पर्याय तरी आहे का? म्हणूनच माय-बाप सरकार तुम्हीच याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

शेतात साधा रोटर फिरवायचा म्हटलं तरी 2000 ते 2500 रुपये खर्च येतो. जिथे मोठ्या आशेने लावलेल्या पिकाला कवडीमोल दर मिळत असल्याने त्या पिकात आज शेतकरी रोटर फिरवत आहे. जिथं शेतमालचं विकला नाही, तर तिथं शेतकर्‍याला रोटर फिरवायलाही उसनवारी करावी लागतेय. शेतीमालाला चांगला दर मिळाला तरी ही वेळ शेतकर्‍यांवर येणार नाही.

आज शेतकर्‍यांना दोन रुपये एवढी कांद्याची पट्टी मिळतेय, पण तोच कांदा बाजारात सर्वसामन्यांना 20 रुपये किलोने विकला जातोय. मग शेतकर्‍यांची कोंडी आणि कोणाची चांदी होतेय? शेतकरी राजाने फक्त काबाड कष्टच करायचं का? शेतकर्‍याला जगाचा पोशिंदा म्हटलं जातं, पण आज या पोशिंद्यावरच काय वेळ आली आहे. आधीच लेकरांच्या तोंडाचा घास घेऊन उसनवारी करून पीक जोमात आणले. पण आता त्यालाच कवडीचा दर मिळतोय. म्हणूनच निदान भाव नसलेल्या पिकात रोटर फिरवण्यासाठी जगाच्या पोशिंद्याला किमान प्रति एकर दोन हजार रुपयांचे अनुदान देण्यात यावे, ही कळकळीची विनंती आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com