
गणेशवाडी |वार्ताहर| Ganeshwadi
केंद्र सरकारने कांदा निर्यात शुल्क 40 टक्के लागू केल्याच्या निषेधार्थ नेवासा तालुका शेतकरी संघटनेने सदर शासन आदेशाची घोडेगाव कांदा मार्केट येथे होळी करत आंदोलन करण्यात आले.
जानेवारी ते मे 2023 या कालावधीत बहुतेक ठिकाणी कांदा उत्पादकांच्या शेतावर अवकाळी पाऊस झाला. अशा परिस्थितीत शेतकर्याचे अतोनात नुकसान झाले. त्यातून शेतकर्यांनी जतन करून ठेवलेला कांदा चाळीमध्ये निम्म्याहून अधिक सडला आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतकर्यांचे उत्पादन खर्च सुद्धा निघणे अशक्य झाले. त्यात भर म्हणून केंद्र सरकारने निर्यात शुल्क 40 टक्के करून कांद्याचे भाव पाडण्याचे षडयंत्र रचले आहे.
तरी सदर शेतकर्यावर अन्याय करणार्या शासन परिपत्रकाची घोडेगाव कांदा मार्केट कमिटीच्या मुख्य प्रवेशद्वारावर शेतकरी संघटनेने होळी केली. तसेच जोपर्यंत केंद्र सरकार हानिकारक निर्यात शुल्क वाढवण्याचा निर्णय मागे घेत नाही तोपर्यंत घोडेगाव कांदा मार्केट हे बंद ठेवण्याचा निर्णय शेतकरी संघटनेने व व्यापारी वर्गाने घेतला आहे. हरीआप्पा तुवर, तालुका अध्यक्ष त्रंबक भदगले, युवा आघाडी अध्यक्ष डॉ. रोहित कुलकर्णी, नगर दक्षिण जिल्हाध्यक्ष बाबासाहेब खराडे पाटील, शेतकरी संघटना प्रसिद्धी प्रमुख सागर लांडे, राजेंद्र दरंदले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रवींद्र मोरे, शरद जोशी विचार मंच प्रदेशाध्यक्ष अंबादास पाटील कोरडे, पंढरीनाथ कोतकर, दौलतराव गणगे, दादासाहेब नाबदे, गोरक्षनाथ महाराज साळुंखे, अनिल दरंदले, संदीप बेल्हेकर, भाऊसाहेब बेल्हेकर, अशोकराव बेल्हेकर, सोमनाथ बेल्हेकर, रामभाऊ दरंदले, रामकृष्ण आगळे, ज्ञानेश्वर चौधरी, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अशोक नाना येळवंडे, सुदाम तागड, शरद सोनवणे, राजेंद्र बराटे, संतोष वाघ, दिगंबर सोनवणे व शेतकरी उपस्थित होते. सोनईचे पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांच्यासह दोन अधिकारी व विस पोलीस कर्मचारी यांनी बंदोबस्त ठेवला होता.
सरकारने जे 40 टक्के निर्यात धोरण अवलंबिले आहे हे संपूर्ण शेतकरी विरोधी धोरण आहे. यापुढे कांदा मागणी वाढणार होती. परंतु शहरी लोकांच्या हितासाठी व निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन सरकारने घेतलेला हा निर्णय म्हणजे शेतकर्यांवर एक अन्यायच आहे.
- अशोक एळवंडे, अध्यक्ष व्यापारी असोसिएशन घोडेगाव