श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda

केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने कांद्यावर तडकाफडकी निर्यातबंदी लादली आहे. वाणिज्य मंत्रालयाच्या विदेश व्यापार

महासंचालनालयाने यासंदर्भात एक पत्रक प्रसिध्द केले आहे. संबंधित निर्णयाची तातडीने अंमलबजावणी सुरू झाली आहे. कांदा निर्यातबंदी केल्याने कांद्याचे बाजारभाव कमी होणार असल्याने शेतकरी अडचणीत येणार आहे.

त्यामुळे केंद्र सरकारने निर्यातबंदी निर्णय मागे घ्यावा, अन्यथा केंद्र सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा माजी आमदार राहुल जगताप यांनी दिला आहे.

दुष्काळी, नापिकी, अतिवृष्टी या नैसर्गीक अस्थिरतेमुळे शेती व्यवसाय पर्यायाने शेतकरी मोठ्या अर्थिक संकटामध्ये आहे. यातून निर्माण होणार्या कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्येचा पर्याय निवडत आहे. श्रीगोंदा तालुका हा रब्बी हंगामातील कांदा लागवड व उत्पादनासाठी राज्यातील अग्रगण्य तालुक्यापैकी एक आहे.

लागवडीचे घटलेले क्षेत्र, वाढलेली मजुरी तसेच मार्च, एप्रिल महिन्यांमध्ये पाण्याची कमतरता यामुळे कांद्याचा उत्पादन कमी होऊन उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणावर झाला व कांद्याची काढणी करण्याची वेळ शेतकर्यांवर आली. त्यावेळेस बाजारभाव नसल्यामुळे कांदा साठवणुकीसाठी ऐरणीचा खर्च करावा लागला. त्यातच करोना संकटामुळे मार्केट बंद राहिले तसेच वातावरणामुळे ऐरणीमध्ये कांदा मोठ्या प्रमाणात सडला आहे.

या पध्दतीने कांदा उत्पादक अगोदरच कमी उत्पन्न, अधिक उत्पादन खर्च यामुळे आर्थिक अडचण असताना केंद्र शासनाने कांदा निर्यातबंदीचा घेतलेला निर्णय जुलमी व शेतकरी विरोधी आहे.

तरी केंद्र सरकारने कांदा बंदीचा घेतलेला निर्णय तत्काळ रद्द करावा अन्यथा या निर्णया विरोधात तालुक्यातील कांदाउत्पादक शेतकर्यांच्यावतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही माजी आमदार राहुल जगताप यांनी दिला. तालुक्यातील काँगेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्यावतीने याबाबत निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले.यावेळी राज्य उपाध्यक्ष घनश्याम शेलार, ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस, नगरसेवक मनोहर पोटे, हरिदास शिर्के, दीपक भोसले, स्मितल वाबळे, राजाभाऊ लोखंडे आदी उपस्थित होते.