मोकळा कांदा विक्रीनंतरचा खर्च खरेदीदारांनी उचलण्याची शेतकरी संघटनेची मागणी

मोकळा कांदा विक्रीनंतरचा खर्च खरेदीदारांनी उचलण्याची शेतकरी संघटनेची मागणी

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा मार्केटमध्ये बारदाणा व गोण्यात न भरता मोकळा कांदा विक्रीचा निर्णय योग्य असला तरी मोकळ्या कांद्याच्या लिलावानंतरचा खर्च व्यापार्‍यांनी उचलावा, अशी मागणी शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी केली आहे.

नाशिक जिल्ह्याच्या धर्तीवर मोकळ्या कांद्याचे लिलाव करण्याचा निर्णय बाजार समितीने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर बाजार समिती व्यवस्थापनाने शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींशी चर्चा करून त्यांची भूमिका जाणून घेतली. यावेळी सचिव किशोर काळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सुरेश ताके, जिल्हाध्यक्ष जितेंद्र भोसले, तालुकाध्यक्ष दत्तात्रय लिप्टे, राजेंद्र भांड, सरपंच प्रभाकर कांबळे, युवराज जगताप, बाळासाहेब बडाख, संचालक मनोज हिवराळे, कांदा विभाग अधिकारी साहेबराव वाबळे उपस्थित होते.

तत्पुर्वी शेतकरी, व्यापारी व संचालक मंडळ अशी संयुक्त बैठक घेतली. बैठकीत अधिकारी, व्यापारी यांनी असा व्यवहार होणार्‍या बाजार समित्यांमध्ये जाऊन प्रत्यक्ष पाहणी करुन नियमावली तयार करण्याचे ठरले. त्यानुसार बाजार समितीचे काही अधिकारी व व्यापारी काही मार्केट्सला भेट देऊन आले. स्वाभिमानी शेतकरी संघटना व शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व बाजार समितीचे अधिकारी यांच्या बैठकीत मोकळ्या कांद्याचे विक्री पध्दतीवर चर्चा झाली.

कांदा मार्केटमधे आडत्या नसेल तर बाजार समिती लिलाव करणार असून लिलाव होईपर्यंत पाऊस, ऊन, वारा, चोरी यापासून माल राखण शेतकर्‍यांना करावे लागेल. लिलाव झाल्यानंतर वाहनातील कांदा खरेदीदाराच्या बाजार समितीतील शेडमध्ये उतरवला जाईल. त्यामुळे त्याने लिलावानंतरचा खर्च उचलावा. लिलावासाठी आणलेला कांदा खाली ओतल्यानंतर तो भरून देण्याचा खर्च शेतकर्‍यांकडून घ्यावा, असे संघटनेच्या नेत्यांनी सांगितले.

गोणी पध्दतीच्या विक्रीमध्ये काट्यावर जाऊन वजन केल्यानंतर माल बाजार समितीच्या शेडमध्ये लावला जातो. त्यानंतर शेतकर्‍यांना काटापट्टी मिळते. सदरचा माल बाजार समिती व आडत्याचे ताब्यात जातो. त्यामुळे मालाच्या रक्षणाची जबाबदारी शेतकर्‍यांची राहत नाही. तो आपल्या कामासाठी शहरात जातो, असे यावेळी निदर्शनास आणून दिले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com